• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त निमगाव वाघा येथे स्वच्छता अभियान

ByMirror

Feb 27, 2026
विद्यार्थ्यांनी दिला ‘स्वच्छ भारत’चा संदेश

विद्यार्थ्यांनी दिला ‘स्वच्छ भारत’चा संदेश


संत गाडगे महाराजांच्या कार्यातून समाजाला स्वच्छतेचे आणि सेवा-भावनेचे अमूल्य धडे मिळाले -पै. नाना डोंगरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे थोर समाजसुधारक, स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नवनाथ विद्यालय, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन करुन शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.


नवनाथ विद्यालयात आयोजित अभिवादन सोहळ्यात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समितीचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, शिक्षकवृंद मंदा साळवे, तृप्ती वाघमारे, शरद भोस, स्वाती इथापे, निकिता रासकर-शिंदे, रेखा जरे-पवार, दिपाली ठाणगे, प्रमोद थिटे, तेजस केदारी तसेच श्री नवनाथ युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे, आप्पा कदम, प्रशांत जाधव, लहानू जाधव आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात प्रत्यक्ष स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला. हातात झाडू, कचऱ्याच्या पिशव्या घेऊन विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व कृतीतून दाखवून दिले. या उपक्रमातून ‘स्वच्छ भारत’चा संदेश देत स्वच्छता हीच खरी देशसेवा असल्याची जाणीव सर्वांना करून देण्यात आली.


मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सार्वजनिक स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. युवक व नागरिकांनी पुढाकार घेतल्यास स्वच्छतेची चळवळ अधिक व्यापक होऊ शकते. स्वच्छतेविषयीची सवय बालपणापासूनच जोपासल्यास भविष्यात स्वच्छ आणि सुदृढ समाज निर्माण होईल, असे त्यांनी नमूद केले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, स्वच्छता ही एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता ती दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे. निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेची नितांत गरज आहे. परिसर स्वच्छ असल्यास साथीचे आजार पसरण्याचा धोका कमी होतो आणि नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहते. संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर समाजप्रबोधन करताना स्वच्छतेला सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या कार्यातून समाजाला स्वच्छतेचे आणि सेवा-भावनेचे अमूल्य धडे मिळाले. आजही त्यांचे विचार समाजाला दिशा देणारे आणि प्रेरणादायी आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले.
या उपक्रमासाठी नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे व सचिव सुमन कुरेल यांनी मार्गदर्शन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *