• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

नागापूर एमआयडीसीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनचरित्रांची पुस्तक भेट

ByMirror

Feb 24, 2026
विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन निरोगी आरोग्याचा कानमंत्र

विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन निरोगी आरोग्याचा कानमंत्र


उमेद सोशल फाऊंडेशनचा छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज जयंतीचा उपक्रम

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागापूर एमआयडीसी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांची संयुक्त जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. उमेद सोशल फाऊंडेशन, जिल्हा क्रीडा कार्यालय व मेरा युवा भारत यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या शौर्य, नेतृत्वगुण आणि संत गाडगे महाराजांच्या समाजसुधारक कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले. यावेळी शाळेतील ग्रंथालयासाठी 65 थोर महापुरुषांच्या जीवनचरित्रासह विविध अभ्यासपूर्ण पुस्तकांची भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना प्रेरणादायी साहित्य उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे फाऊंडेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तसेच यावेळी विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणीही करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून निरोगी आरोग्यासाठी आवश्‍यक सूचना देण्यात आल्या.


उमेद सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे यांनी आपल्या मनोगतातून महापुरुषांचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता ते आचरणात आणणे गरजेचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा सचिव उज्वला गवळी म्हणाल्या की, उमेद सोशल फाऊंडेशन गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहन देत आहे. या चळवळीद्वारे अनेक गरजूंना आधार मिळत असून, हे कार्य प्रत्येक गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.


या प्रसंगी बालचित्रकला स्पर्धेत राज्यस्तरावर चौथा क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी कु. विधी गुडेकर हिचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास उमेद सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, सचिव सचिन साळवी, जिल्हा सचिव उज्वला गवळी, खजिनदार संजय निर्मळ, सल्लागार ॲड. दिपक धिवर, सोशल मीडिया प्रतिनिधी विजय लोंढे, सदस्य रवी सुरेकर, प्रदीप बागुल, कावेरी भिंगारदिवे, तसेच काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी कॉलेजचे डॉ. अजहर शेख, माजी विद्यार्थी राहुल जाधव, संदीप साळवे, सचिन वानखेडे, नितीन भाकरे आदी उपस्थित होते.


याशिवाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल मूळे, आशा लोखंडे, योगेश शिंदे, मंगल गवळी, राजेंद्र औटी, शुभांगी राहणे, वैशाली शेळके, छाया ढगे, रेखा वाघमारे यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र औटी यांनी केले, तर आभार वैशाली शेळके यांनी मानले. या उपक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, प्रवीण कोंढावळे, प्रियांका खिंडरे तसेच मेरा युवा भारतचे जिल्हा समन्वय अधिकारी सत्यजित संतोष, रमेश गाडगे व ॲड. महेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *