• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

भाऊसाहेब कदम यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

ByMirror

Feb 13, 2026
भाऊसाहेब कदम यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

दिव्यांग शिक्षणासाठी मोलाचे कार्य; ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार सन्मान

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय व मोलाचे योगदान दिल्याबद्दल भाऊसाहेब लक्ष्मण कदम यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव पाचव्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार असून, त्यामध्ये भाऊसाहेब कदम यांची ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे संयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे आणि श्री नवनाथ युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे यांनी ही माहिती दिली.


भाऊसाहेब लक्ष्मण कदम हे टिळक रोड येथील ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटीच्या कार्यशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसनासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी केवळ शैक्षणिक मार्गदर्शनच केले नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करून त्यांना स्वावलंबी जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित केले आहे.


कदम यांनी अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत स्वतःचे स्थान निर्माण केले असून, समाजात सन्मानाने उभे राहण्याची ताकद मिळवली आहे. शिक्षणासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्य प्रशिक्षण आणि पुनर्वसन यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.


ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीच्या वतीने भाऊसाहेब कदम यांची ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला असून, पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *