• Sun. Jun 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शहरात ‘आनंद सप्ताह’ उत्साहात

ByMirror

Nov 28, 2025
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त रिमांड होम केंद्राचा उपक्रम

चित्रकला, ब्रेल लेखन, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


जागतिक दिव्यांग दिनानिमित्त रिमांड होम केंद्राचा उपक्रम

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण विभाग, रिमांड होम केंद्र यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित ‘आनंद सप्ताह’ विविध उपक्रमांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणार पार पडला. दिव्यांग विद्यार्थ्यांना संधी, प्रेरणा आणि स्वतःच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने सलग पाच दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
रिमांड केंद्रातील शाळांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, ब्रेल लिपी लेखन स्पर्धा, गायन, कथाकथन, नाट्यस्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. चित्रकला स्पर्धेत अल्पदृष्टी विद्यार्थ्यांनीही रंगभरणाचा आनंद घेत विशेष सहभाग नोंदवला, तर ब्रेल लेखन स्पर्धेत अनाम प्रेम संस्थेतील अंध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत इतरांसाठी उत्तम प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले.


विशेष शिक्षक उमेश शिंदे म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा, उत्साह आणि स्वतःला सिद्ध करण्याची तीव्र इच्छा दिसून येते. त्यांच्या सहभागामुळे स्पर्धा अधिक अर्थपूर्ण बनली होती. केंद्रातील सर्व शाळांमध्ये स्पर्धांचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले असून प्रत्येक स्पर्धा उत्साहात पार पडत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष शिक्षक रामेश्‍वर ढगे यांनी क्रीडा स्पर्धांनाही विद्यार्थ्यांचा तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शाळांनीही उत्कृष्ट आयोजन केल्याचे स्पष्ट केले.


शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, हा आनंद मेळावा हा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष आनंददायी क्षण असून, त्यांचा उत्साह पाहून आनंद होत आहे. अशा उपक्रमांतून त्यांच्या आत्मविश्‍वासात नक्कीच द्विगुणीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


आनंद सप्ताहातील सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या उपक्रमाला अनाम प्रेम संस्थेचे अध्यक्ष इं. अजित माने, विश्‍वस्त डॉ. मेघना मराठे, अमृत भुसारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच राहुल खिरोडे, चेतन लांडगे, प्रकाश गजे, सुरेखा कोतकर हे यावेळी उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *