स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचा एक वर्षाचा फॉर्म्युला; सर्वांना संधी देण्याची भूमिका, अभ्यासिका व ठेवी वाढ अभियानाची घोषणा
‘पदापेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा’; संस्थेच्या पुढील 25 वर्षांच्या विकासाचा पाया रचला जाणार -बाबासाहेब बोडखे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाच्या एक वर्षाच्या कालावधीनंतर चेअरमनपदी बाबासाहेब बोडखे व व्हाईस चेअरमनपदी आप्पासाहेब जगताप यांची मंगळवारी (दि. 28 जुलै) बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच तज्ञ संचालकपदी कल्याण ठोंबरे (नगर तालुका) व बाजीराव जाधव (कर्जत) यांची नियुक्ती करण्यात आली.
मावळते चेअरमन आप्पासाहेब शिंदे व व्हाईस चेअरमन अर्जुन वाळके यांनी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून दिलेल्या राजीनाम्यानंतर ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली. चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक के. के. आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोसायटीच्या सभागृहात पार पडली.
चेअरमनपदासाठी बाबासाहेब बोडखे तर व्हाईस चेअरमनपदासाठी आप्पासाहेब जगताप यांचा प्रत्येकी एकमेव अर्ज प्राप्त झाला. चेअरमनपदासाठी महेंद्र हिंगे हे सुचक तर सुधीर कानवडे अनुमोदक होते. व्हाईस चेअरमनपदासाठी अर्जुन वाळके हे सुचक तर शिवाजी लवांडे अनुमोदक होते. सर्व संचालकांच्या बहुमताने के. के. आव्हाड यांनी बाबासाहेब बोडखे यांची चेअरमनपदी व आप्पासाहेब जगताप यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करून त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी माध्यमिक शिक्षक सोसायटीचे सचिव स्वप्निल इथापे, माजी चेअरमन आप्पासाहेब शिंदे, माजी व्हाईस चेअरमन अर्जुन वाळके, संचालक महेंद्र हिंगे, सुनील दानवे, सुरज घाटविसावे, वैशाली दारकुंडे, वर्षा खिलारी, विजय पठारे, अतुल कोताडे, बाजीराव अनभुले, शिवाजी लवांडे, छबू फुंदे, साहेबराव रक्टे, ईश्वर धुमाळ, संभाजी गाडे, बाळाजी गायकवाड, सुधीर कानवडे, राजेंद्र कोतकर, उमेश गुंजाळ आदी उपस्थित होते.
निवडीनंतर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी माजी चेअरमन आप्पासाहेब शिंदे म्हणाले की, सोसायटीमध्ये प्रत्येकाला संधी दिली जाणार आहे. सेवानिवृत्ती जवळ आलेल्या सभासदांचाही विचार करून त्यांना जबाबदारी देण्यात येईल. सर्वांना एकाच वेळी संधी देता येणार नसली तरी भविष्यात प्रत्येकाचा विचार केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर एमपीएससी व यूपीएससी अभ्यासिका सुरू होत असून तिचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच संस्थेच्या तालुका पातळीवरील कार्यालयांमध्येही अभ्यासिका सुरू करण्याचा मानस आहे. संस्थेत सध्या 7.5 टक्के व्याजदर असून 50 कोटी रुपयांच्या ठेवी वाढल्यास व्याजदर वाढविण्याची गरज भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी चेअरमन सुरेश मिसाळ, विलास साठे, संजय निक्रड, ज्ञानदेव बेरड, रमजान हवालदार, उद्धव गायकवाड, आबासाहेब जगताप, शहर बँकेचे व्हाईस चेअरमन प्रा. माणिक विधाते, मारुती लांडगे, प्राथमिक बँकेचे माजी चेअरमन आबासाहेब जगताप तसेच माजी सभापती माधवराव काटे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी पंचवीस वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेली सत्ता, एका वर्षात केलेली उल्लेखनीय कामगिरी, सर्वांना संधी देण्याची भूमिका तसेच संस्था स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेतला.
सुभाष कडलग म्हणाले की, माध्यमिक शिक्षक सोसायटीत अनेक विद्यार्थी चेअरमन होत असल्याचे पाहून आनंद होत आहे. परिवर्तन मंडळात कोणतेही मतभेद नसून सर्व संचालक एकदिलाने काम करत आहेत. बिनविरोध निवड झालेले चेअरमन व व्हाईस चेअरमन हे चळवळीतील कार्यकर्ते असून त्यांच्या माध्यमातून संस्थेचे काम अधिक प्रभावीपणे होईल. मुलींच्या होस्टेलची पायाभरणीही या कार्यकाळात व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. व्हाईस चेअरमन आप्पासाहेब जगताप यांनी सर्व संचालकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार मानले.
नवनिर्वाचित चेअरमन बाबासाहेब बोडखे म्हणाले की, सर्व संचालक मंडळ संस्थेच्या हितासाठी एकदिलाने काम करत आहे. सध्या सुरू असलेले कार्य हे संस्थेच्या पुढील 25 वर्षांच्या विकासाची पायाभरणी ठरणार आहे. जिल्हा बँकेची 158 कोटी रुपयांवर गेलेली सीसी नियमबाह्य कामकाज थांबवून आणि काटकसर करून 72 कोटी रुपयांवर आणल्याचा दावा त्यांनी केला.
संस्थेच्या ठेवी वाढविण्यासाठी विशेष अभियान सुरू करण्यात येणार असून सर्व संचालक स्वतः ठेवी ठेवून या अभियानाची सुरुवात करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्व संचालक संस्थेचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करत असून पद, सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेपेक्षा स्वाभिमानाने काम करणारे हे संचालक असल्याचे त्यांनी नमूद केले. दत्ता पाटील नारळे म्हणाले की, संचालकांनी एका वर्षात आदर्श कामगिरी करून सभासदांची मने जिंकली आहेत. सत्ता टिकवण्यासाठी नव्हे, तर सभासदांचे हित जपण्यासाठी हे संचालक मंडळ कार्यरत असून काटकसरीने काम करून सभासदांचे हित जोपासले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. सुनील पंडित म्हणाले की, मामासाहेब हातवळणे यांनी 1947 साली या संस्थेची उभारणी केली. 25 वर्षांच्या सत्तांतरानंतर स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने एका वर्षात उत्कृष्ट काम करून दिलेली वचने पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. मुलींच्या वस्तीगृहासाठी महापालिकेकडून ओपन स्पेस उपलब्ध करून घ्यावी, तसेच तालुकास्तरावर अभ्यासिका सुरू झाल्यामुळे सभासदांच्या मुलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होईल. संस्थेने धोरणात्मक पद्धतीने सुरू केलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
या सभेसाठी बाळासाहेब राजळे, नंदकुमार शितोळे, शिरीष टेकाडे, ज्ञानेश्वर काळे, बाळासाहेब सोनवणे, दीपक बुधवंत, नवनाथ घुले, राजू सोनवणे, सुभाष गव्हाणे तसेच माजी चेअरमन सत्यवान थोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र हिंगे यांनी केले, तर आभार उमेश गुंजाळ यांनी मानले.

