घोषणांमुळे दुमदुमला परिसर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल व जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘नशा मुक्त अहिल्यानगर’ अभियानातंर्गत नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट संचालित अहमदनगर उर्दू प्रायमरी स्कूल, अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांनी शहरातून जनजागृती रॅली काढली. या रॅलीद्वारे नशामुक्तीचा संदेश देण्यात आला.
रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश देणारे विविध फलक हातात घेत नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती करण्यात आली. “नशा छोडो, भारत जोडो”, “नशा मिटाव, देश बचाव”, “भविष्य बनाव, सेहत का खयाल रखो” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी मंगलगेट, कोठला भागातून रॅली काढली. या घोषणांमुळे परिसर व्यसनमुक्तीच्या संदेशाने दुमदुमून गेला.
पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी अहिल्यानगर जिल्हा व्यसनमुक्त करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. समाजातील तरुण पिढीला अंमली पदार्थ व इतर व्यसनांपासून दूर ठेवण्याचा तसेच निरोगी व सुदृढ समाज घडविण्याचा संकल्पही सर्वांनी व्यक्त केला.
या अभियानासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे मार्गदर्शन लाभले. या रॅलीत शालेय विद्यार्थ्यांसह शिक्षक देखील सहभागी झाले होते.

