लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक मेळावा उत्साहात
पालक आणि शिक्षकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मार्ग घडवण्याबाबत मार्गदर्शन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास केवळ शाळेपुरता मर्यादित नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी शाळा आणि पालक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद व समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांनी शिक्षकांशी नियमित संवाद साधून मुलांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक, मानसिक आणि भावनिक विकासाकडे लक्ष देण्याचे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे यांनी केले.
कापड बाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयात आयोजित पालक-शिक्षक मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात पांडुळे बोलत होते. यावेळी माजी ऑडिटर विश्वासराव काळे, माजी नगरसेवक संजय घुले, माजी बॉक्सिंग चॅम्पियन शामराव व्यवहारे, विष्णुपंत म्हस्के, भाऊसाहेब कर्डिले, गटणे ताई, बेरड, माध्यमिक विभागाचे प्रभारी मुख्याध्यापक महादेव भद्रे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर यांच्यासह शाळेतील शिक्षक, पालक आणि पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे पांडुळे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालक आणि शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पालकांनी वेळोवेळी शिक्षकांशी संवाद साधावा. मुलांच्या अडचणी समजून घेत त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक करताना प्रभारी मुख्याध्यापक महादेव भद्रे यांनी शाळेत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची माहिती दिली. या मेळाव्यास पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शाळेतील शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती, शिस्त, उपस्थिती तसेच विविध सहशालेय उपक्रमांबाबत शिक्षकांशी संवाद साधला. या सभेला महिला पालकांची संख्या लक्षणीय होती.
माजी ऑडिटर विश्वासराव काळे यांनीही पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे केवळ गुणांच्या दृष्टिकोनातून न पाहता त्यांच्या अंगभूत गुणांना आणि कौशल्यांना प्रोत्साहन द्यावे, असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी ओळखून त्यांना योग्य क्षेत्रात पुढे जाण्यासाठी पालक व शिक्षकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शालेय शिक्षक प्रदीप पालवे, सुनीता लांडगे आणि स्मिता पिसाळ यांनी विविध विषयांवर पालकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, नियमित उपस्थिती, अभ्यासातील सातत्य, शिस्त, मोबाईल व डिजिटल माध्यमांचा योग्य वापर, विद्यार्थ्यांच्या सवयी तसेच पालकांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पालक-शिक्षक संघाचे सचिव एस.एम. गारुडकर, ज्येष्ठ शिक्षिका एस.एस. लांडगे, एम.एस. कारखिले यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते.

