• Fri. Oct 9th, 2026

Mirrornews24

Marathi News

वीज गेली की उत्पादन ठप्प, नुकसान मात्र उद्योजकांच्या माथी आमी संघटनेचा महावितरणला जाब

ByMirror

Oct 9, 2026
उद्योगांचा आर्थिक कणा मोडू नका-जयद्रथ खाकाळ यांचा महावितरण प्रशासनाला इशारा

उद्योजकांच्या सहनशीलतेचा अंत! वीजपुरवठ्याच्या लपंडावाविरोधात आमी संघटनेचा महावितरणला घेराव


उद्योगांचा आर्थिक कणा मोडू नका-जयद्रथ खाकाळ यांचा महावितरण प्रशासनाला इशारा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर एमआयडीसी परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे उद्योजकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून सुरू असलेल्या वीजपुरवठ्याच्या लपंडावामुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या गंभीर प्रश्‍नाकडे महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमी संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. वीजपुरवठ्याची समस्या तातडीने सोडवून उद्योगांना नियमित वीज उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.


एमआयडीसी परिसरातील डी, एफ, ए आणि एल ब्लॉकमध्ये दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने औद्योगिक उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. एमआयडीसीतील इतर ब्लॉकमध्येही वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असल्याने उद्योजकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मशीनरी बंद पडणे, कच्च्या मालाचे नुकसान होणे, उत्पादन प्रक्रियेत अडथळे निर्माण होणे आणि ग्राहकांच्या ऑर्डर वेळेत पूर्ण न होणे, अशा अनेक समस्यांना उद्योजकांना सामोरे जावे लागत आहे.


उद्योग सुरू ठेवण्यासाठी उद्योजकांना कामगारांचे वेतन, वीजबिल, कर्जाचे हप्ते, कच्च्या मालाचा खर्च आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. मात्र, वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने उत्पादन खर्च वाढत असून उद्योगांच्या नफ्यावर विपरीत परिणाम होत आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास अनेक उद्योगांसमोर उत्पादन बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे महावितरण प्रशासनाने या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे उद्योजकांनी स्पष्ट केले.
आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी यावेळी तीव्र शब्दांत भूमिका मांडताना सांगितले की, अहिल्यानगर एमआयडीसीमधील उद्योजक गेल्या सहा ते सात महिन्यांपासून अनियमित वीजपुरवठ्याचा त्रास सहन करत आहेत. वारंवार वीज खंडित होऊन उद्योगांचे नुकसान होत असताना महावितरण प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. उद्योजकांनी बँकांचे कर्ज काढून, स्वतःची आर्थिक गुंतवणूक करून आणि अनेक अडचणींवर मात करून उद्योग उभे केले आहेत. हजारो कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्‍न या उद्योगांशी जोडलेला आहे. अशा परिस्थितीत वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू राहणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.


ते पुढे म्हणाले, शेतकरी आर्थिक संकटामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या घटना आपण पाहत आहोत. आता उद्योगांवरही आर्थिक संकट कोसळत आहे. उद्योग टिकले तर रोजगार टिकेल, कामगारांच्या घरातील चूल पेटेल आणि शहराची आर्थिक घडी मजबूत राहील. मात्र, वीजपुरवठाच नियमित नसेल, तर उद्योजकांनी उद्योग कसे चालवायचे? मशीनरी बंद, उत्पादन ठप्प आणि आर्थिक नुकसान मात्र उद्योजकांच्या माथी, ही परिस्थिती आणखी किती दिवस सहन करायची.उद्योजक हा शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हा कणा मजबूत करण्याऐवजी अनियमित वीजपुरवठ्यामुळे तो कमकुवत होत असेल, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? महावितरण प्रशासनाने केवळ आश्‍वासने न देता प्रत्यक्ष कृती करावी. वारंवार वीज का खंडित होते, त्यामागील तांत्रिक अडचणी कोणत्या आहेत आणि त्या दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत, याची स्पष्ट उत्तरे प्रशासनाने द्यावीत. उद्योजकांच्या संयमाचा अंत पाहू नका. उद्योगांचे नुकसान थांबविण्यासाठी तातडीने ठोस निर्णय घ्या, असा आक्रमक इशारा जयद्रथ खाकाळ यांनी दिला.


यावेळी एमआयडीसी परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार यांनी उद्योजकांना विविध कामे पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले. पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता 5 एमव्हीएवरून 10 एमव्हीए करण्याचा प्रस्ताव नाशिक झोन व मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून, हे काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


नवीन उपकेंद्रासाठी एमआयडीसीने भूखंड क्रमांक AM-35 दिला असून, 25 टक्के ईएमडीची 6 लाख 67 हजार 500 रुपयांची रक्कम सिव्हिल डिव्हिजन कार्यालयात जमा झाली आहे. ही रक्कम लवकरच एमआयडीसीकडे वर्ग करण्यात येणार आहे. तसेच 11 केव्ही चाकण फीडरचे रिकंडक्टरिंग, बजाज फीडरचे लोड शिफ्टिंग आणि बालाजी फीडरवरील झाडांच्या फांद्यांची छाटणी व देखभाल करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सबस्टेशनमधील रिले बदलल्यामुळे ट्रिपिंग कमी झाल्याची माहितीही अधीक्षक अभियंत्यांनी दिली. यावेळी आम्ही संघटनेचे पदाधिकारी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


–—
आपल्या मागून औद्योगिक विकासाच्या प्रवासाला सुरुवात केलेली नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, शिरूर आणि सुपे यांसारखी औद्योगिक क्षेत्रे आज वेगाने प्रगती करत आहेत. मात्र, अहिल्यानगर एमआयडीसीमध्ये आजही उद्योजकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे.- उद्योजक राजेंद्र शुक्रे
वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा ही उद्योगांसाठी मोठी समस्या बनली आहे. उद्योगांना नियमित वीज मिळत नसेल, तर नवीन गुंतवणूक कशी येणार आणि रोजगाराच्या संधी कशा निर्माण होणार? प्रशासनाने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून अहिल्यानगरच्या औद्योगिक विकासासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. -उद्योजक राजेंद्र कटारिया
आमची मागणी कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून, उद्योगांच्या विकासासाठी आणि उद्योजकांच्या न्याय्य हक्कांसाठी आहे. -उद्योजक महेश इंदानी
महावितरण प्रशासनाने वारंवार वीज खंडित होण्यामागील कारणे शोधून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे, नवीन उपकेंद्र उभारणे आणि फीडरची देखभाल ही कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करावीत. अहिल्यानगरच्या उद्योजकांना इतर शहरांप्रमाणे सुविधा मिळाल्या पाहिजेत. अन्यथा उद्योगांची वाढ खुंटेल आणि रोजगारनिर्मितीवरही परिणाम होईल. -उद्योजक अमोल घोलप

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *