• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सफाई कामगारांना मिठाई व पणत्यांची दिवाळी भेट

ByMirror

Oct 21, 2022

भाजप महिला आघाडीचा उपक्रम

भिंगारकरांच्या आरोग्यासाठी सफाई कामगारांची अविरतपणे सेवा -ज्योत्सना मुंगी

अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्षभर सार्वजनिक स्वच्छतेची सेवा देऊन भिंगारकरांचे आरोग्य जपणारे व केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात कॅन्टोन्मेंट बोर्डाला तृतीय क्रमांक मिळवून देणार्‍या भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सफाई कामगार व कर्मचार्‍यांना भाजप महिला आघाडीच्या वतीने मिठाई व पणत्यांची दिवाळी भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानपूर्वक मिळालेल्या दिवाळी भेटीने सफाई कामगार भारावले.


शुक्रवारपासून (दि.21 ऑक्टोबर) गोवत्स द्वादशीने दिवाळीची सुरुवात झाली असताना, भिंगार शहर भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योत्सना मुंगी यांच्या पुढाकाराने भिंगार येथील दत्त मंदिरात हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. सफाई कामगारांना दिवाळी निमित्त भेट देऊन कर्मचार्‍यांच्या सणात सुखाचे चारक्षण पेरण्यात आले. जान्हवी मुंगी यांच्या हस्ते सर्व सफाई कामगार व इतर कर्मचार्‍यांना मिठाईचे बॉक्स व पणत्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी संगीता मुळे, माजी नगरसेविका शुभांगी साठे, प्रिया जानवे, निलिमा धर्माधिकारी, मृदुला कुलकर्णी, नलिनी नागपुरे, सुनील राऊत, स्नेहबंध फाउंडेशनचे उद्धव शिंदे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य मयूर जोशी आदी उपस्थित होते.


भाजप महिला आघाडीच्या भिंगार अध्यक्षा ज्योत्सना मुंगी म्हणाल्या की, भिंगारकरांच्या आरोग्यासाठी सफाई कामगार अविरतपणे सेवा देत आहेत. कोरोना काळातही त्यांनी जीवाची बाजी लावून या सेवा पुरविल्या. या कर्मचार्‍यांच्या योगदानाने नागरिकांचे आरोग्य जपले जात आहे. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाकडून स्वच्छ सर्वेक्षणात मिळालेला तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारात सफाई कामगारांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांचा कार्याचा सन्मान व दिवाळी गोड करण्यासाठी ही भेट देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *