• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना दिवाळी पुर्वी तातडीची मदत द्यावी

ByMirror

Oct 6, 2022

शेतकर्‍यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाईसाठी जिल्ह्या ऐवजी गावांचा निकष लावावा

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ.सुभाष लांडे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदतीसाठी जिल्ह्याचा निकष न ठेवता गावांचा निकष लावून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना दिवाळी पुर्वी तातडीची मदत करण्याची मागणी राज्य सरकारकडे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.


महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. त्या यादीत अहमदनगर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांचे नावे आलेली नाहीत, मात्र राज्यात अनेक जिल्ह्यातील काही गावांना अतिवृष्टीचा फटका मात्र बसला आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पुर्ण राज्यभरात शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्याचा निकष असल्याने अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसून देखील जिल्हा निकष लावल्याने शासनाच्या मदतीपासून शेतकर्‍यांना वंचित रहावे लागणार असल्याचे कॉ. लांडे यांनी स्पष्ट केले आहे.


अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी निकष ठरवताना, जिल्हा निकष न ठरवता राज्यातील गावांचा निकष ठरविणे आवश्यक होते. जिल्हा किंवा तालुका अतिवृष्टीग्रस्त जाहीर करून चालणार नसून, शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी गावांचा निकष लावण्याची गरज आहे. राज्यभरात गावपातळीवर सक्षम यंत्रणेमार्फत पाहाणी करून ज्याशेतकर्‍यांचे प्रत्यक्ष नुकसान झाले आहे, अशा सर्व शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळायला हवी. त्यांच्या खात्यावर दिवाळीपुर्वी तातडीची मदत पाठविण्याचे निवेदनात म्हंटले आहे.


महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील कमी अधिक प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झालेले असून, सर्व गावांचे सक्षम यंत्रणेमार्फत सर्वेक्षण व्हावे, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना जिल्ह्याचा निकष न ठेवता गावांचा निकष लावावा, नुकसानग्रस्त सर्व शेतकर्‍यांना दिवाळीपुर्वी तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *