युवाशक्तीच्या बळावर शिवसेनेची संघटनात्मक बांधणी; युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
राज्य सचिव राम रेपाळे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युवकांची संघटनात्मक ताकद हीच शिवसेनेची खरी शक्ती असून, युवकांच्या सहभागातून पक्षाची विचारधारा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना व युवासेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचे काम उत्तम प्रकारे सुरु असल्याची भावना शिवसेनेचे राज्य सचिव तथा अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुख राम रेपाळे यांनी व्यक्त केली.
शहरातील शासकीय विश्रामगृह येथे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी रेपाळे बोलत होते. युवासेना जिल्हाप्रमुख योगेश गलांडे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे व बाबुशेठ टायरवाले यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुया करण्यात आल्या. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी नगरसेवक दिलीप सातपुते, संदेश कार्ले, नवनाथ कातोरे, ओंकार सातपुते, शंकर शेळके, वैष्णव गलांडे, दीपक परभाणे, योगेश गाडीलकर, सागर गायकवाड, सागर सूर्यवंशी, मनोज क्षीरसागर, अक्षय कोटे, आदित्य वांडेकर, संकेत साठे, सचिन झिटे, विकास पठारे, प्रमोद पठारे, सूरज रासकर, वैभव वाघ, सुनील मुसमाडे, विलास भोसले, वैभव कारखिले, ओम गोडसे, सोनू उबाळे, बद्रीनाथ गीते, शुभम खेडकर, रोहन पवार, अक्षय खाडे, रोहित पवार, अरबाज खान, सौरभ इंगळे आदींसह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना रेपाळे म्हणाले की, शिवसेनेने राज्याच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा, जिद्द आणि समाजासाठी काहीतरी करण्याची क्षमता आहे. या ऊर्जेला योग्य दिशा देण्याचे काम युवासेनेच्या माध्यमातून केले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील युवक शिवसेनेच्या विचारांशी जोडले जात असून, त्यांच्या माध्यमातून संघटना अधिक सक्षम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या नियुक्त्यांमध्ये नगर युवासेना उपतालुका प्रमुखपदी सचिन भिमराज खेसे (हमीदपूर) व विशाल शिवाजी गिते (नवनागापूर) यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच नगर युवासेना तालुकाप्रमुखपदी शिवाजी मधुकर सोनवणे (कामरगाव), तर पारनेर युवासेना तालुकाप्रमुखपदी गणेश नारायण पठारे (मावळवाडी) यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात युवकांचे संघटन करून शिवसेनेचे विचार व ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवावीत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
युवासेना जिल्हाप्रमुख योगेश गलांडे म्हणाले की, “अहिल्यानगर जिल्ह्यात युवासेनेचे संघटन अधिक व्यापक आणि मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. युवकांना संघटनेत योग्य संधी आणि जबाबदारी दिल्यास ते निश्चितच चांगले काम करू शकतात. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरातील युवकांना एकत्र आणून त्यांच्या समस्या जाणून ते शिवसेनेच्या माध्यमातून सोडविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे म्हणाले की, “संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. पद हे केवळ सन्मानाचे प्रतीक नसून जनतेच्या सेवेसाठी मिळालेली जबाबदारी आहे. युवकांनी गावागावांत आणि शहरातील प्रत्येक प्रभागात संघटनेचे जाळे निर्माण करावे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि युवकांची ऊर्जा यांच्या समन्वयातून अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना व युवासेना अधिक ताकदीने उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला.

