लोकशाही आणि सहकाराच्या रक्षणासाठी ‘शकुनी-तंत्रालया’विरोधात एल्गार.
गोकुळ -सत्ता मिळविण्यासाठी काढण्यात आलेल्या त्या अध्यादेशाचा निषेध
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शेतकरी, आदिवासी, शेतमजूर आणि कष्टकरी वर्गाच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे झुंजार नेते कॉम्रेड डॉ. अजित नवले यांना पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने ‘स्वराज्यसेनानी’ या किताबाने सन्मानित करून मानवंदना देण्यात आली. लोकशाही मूल्यांचे रक्षण, संविधानाची प्रभावी अंमलबजावणी आणि सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारांसाठी लढणाऱ्या आधुनिक काळातील लढवय्यांना स्वतंत्र ओळख व राष्ट्रीय प्रतिष्ठा मिळावी, या उद्देशाने ‘स्वराज्यसेनानी’ ही अभिनव लोकसन्मान संकल्पना पुढे आणण्यात आली आहे.
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत जनतेने दिलेल्या कौलानंतरही मागच्या दाराने सत्ता मिळविण्यासाठी काढण्यात आलेल्या अध्यादेशाच्या निषेधार्थ पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनांतर्गत अहिल्यानगर येथील हुतात्मा स्मारक परिसरात महाराष्ट्राच्या मंत्रालयाचे प्रतीकात्मक नामकरण ‘शकुनी-तंत्रालय’ असे करण्यात आले. लोकशाही आणि सहकार व्यवस्थेचे कथित वस्त्रहरण रोखण्यासाठी लोकशाहीच्या पुतळ्याला तिरंग्याची वस्त्रे नेसविण्यात आली. यावेळी लोकशाही आणि सहकार वाचविण्याचा संदेश देण्यात आला. या आंदोलनात ॲड. कारभारी गवळी, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, पोपट भोसले, अभिमान शिंदे, राजू उमाप, प्रवीण शिंदे, सोहम शिंदे, चतुरा शिंदे, दिगंबर साबळे, दत्तात्रय साबळे, निकिता रणदिवे, गीतल उमाप, वैशाली पेटारे, सनी शिंदे आदी सहभागी झाले होते.
स्वातंत्र्यपूर्व काळात परकीय सत्तेविरुद्ध संघर्ष करणाऱ्या क्रांतिकारकांना आणि देशभक्तांना ‘स्वातंत्र्यसेनानी’ म्हणून ओळखले जाते. त्याच धर्तीवर स्वातंत्र्यानंतर देशात खऱ्या अर्थाने लोकशाही व्यवस्था रुजविण्यासाठी, संविधानातील मूलभूत अधिकार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्या व्यक्तींना ‘स्वराज्यसेनानी’ म्हणून राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी, अशी या संकल्पनेमागील भूमिका आहे.
डॉ. अजित नवले यांनी शेतकरी चळवळीच्या माध्यमातून शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या कष्टकरी कुटुंबांना न्याय मिळावा, त्यांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळावा आणि शेती क्षेत्रातील समस्यांची प्रभावी सोडवणूक व्हावी, यासाठी त्यांनी विविध आंदोलनांच्या माध्यमातून संघर्ष केला आहे. तसेच पिढ्यान्पिढ्या वनजमिनीवर उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळाव्यात, वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि आदिवासी समाजाला सन्मानाचे जीवन जगता यावे, यासाठीही त्यांनी सातत्याने लढा दिला आहे. त्यांच्या या संघर्षाची दखल घेऊन त्यांची ‘स्वराज्यसेनानी’ किताबासाठी निवड करण्यात आली.
या आंदोलनात कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर घडलेल्या राजकीय घडामोडींवरून राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका करण्यात आली. संघटनांच्या म्हणण्यानुसार, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या गटाला 13 जागा, तर विरोधी गटाला 12 जागा मिळाल्या होत्या. मात्र, 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या संघीय सहकारी संस्थांवर शासननियुक्त प्रतिनिधी नेमण्याची तरतूद करणारा अध्यादेश 6 नोव्हेंबर रोजी काढण्यात आला. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम 73अअअ(2) मध्ये बदल करून एका शासकीय अधिकाऱ्यासह मताधिकार असलेले चार शासननियुक्त सदस्य नेमण्याची तरतूद करण्यात आल्याचा आरोप संघटनांनी केला.
या अध्यादेशाच्या आधारे गोकुळ दूध संघावर चार मताधिकार असलेले संचालक नियुक्त करण्यात आल्याने अल्पमतातील 12 सदस्यांच्या गटाला संख्याबळ मिळवून सत्ता हस्तगत करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा आरोप करण्यात आला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही याच पद्धतीचा वापर करून बहुमत असलेल्या विजयी गटाकडून सत्ता हिरावून घेण्यात आल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर मंत्रालयाचे प्रतीकात्मक नामकरण ‘शकुनी-तंत्रालय’ करण्यात आले. महाभारतात शकुनीने कपटनीतीच्या माध्यमातून द्रौपदीच्या वस्त्रहरणाला हातभार लावला होता. त्याच प्रतीकाचा आधार घेत लोकशाही आणि सहकार व्यवस्थेचे वस्त्रहरण होत असल्याचा निषेध नोंदविण्यासाठी हे नामकरण केल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
यावेळी सहकार क्षेत्र हे आर्थिक न्याय देणारे महत्त्वाचे माध्यम असल्याचे सांगण्यात आले. नगर जिल्ह्यात सहकाराची मोठी परंपरा असून, सहकारी संस्था टिकल्या आणि सक्षम झाल्या पाहिजेत. राहुरीचा कारखाना आणि जगदंबा कारखाना यांसारख्या संस्थांची झालेली अवस्था लक्षात घेता गोकुळसारखी महत्त्वाची सहकारी संस्था अडचणीत येऊ नये, यासाठी सहकाराचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
देशात संविधानाचे राज्य टिकले पाहिजे, लोकशाही मजबूत झाली पाहिजे आणि सहकार चळवळ वाढली पाहिजे. त्यासाठी डॉ. अजित नवले यांच्यासारखे शेतकरी, आदिवासी आणि कष्टकरी जनतेच्या हक्कांसाठी लढणारे शेकडो-हजारो स्वराज्यसेनानी आणि स्वराज्यसैनिक तयार होणे ही काळाची गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

