जिल्हा मानसिक आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी व औषधोपचार
निराधार व बेघर मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना शिबिरात मिळाले उपचार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या, रस्त्यावर निराधार व बेघर अवस्थेत जीवन जगणाऱ्या तसेच मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना आधार देण्याबरोबरच त्यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली जावी आणि त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, या सामाजिक बांधिलकीतून जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथील जिल्हा मानसिक आरोग्य विभागाच्या वतीने श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्प येथे मानसिक आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये मानवसेवा प्रकल्पातील एकूण 81 लाभार्थ्यांची मानसिक आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर प्रत्येक लाभार्थ्याच्या मानसिक आरोग्यस्थितीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार जिल्हा रुग्णालयामार्फत औषधांचे वितरण करण्यात आले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानसोपचार तज्ज्ञ डॉ. तेजस्विनी मिस्कीन, मनोविज्ञान तज्ज्ञ श्रीमती मीनल कटकोळ, सामाजिक कार्यकर्ते श्री. इंगोले गोरक्ष आणि मानसोपचार परिचारक श्री. अनिकेत केदारी यांनी या शिबिरात सक्रिय सहभाग घेतला. वैद्यकीय पथकाने प्रत्येक लाभार्थ्याशी संवाद साधून त्यांच्या मानसिक आरोग्याची तपासणी केली. त्यांच्या मानसिक स्थितीचे मूल्यमापन करून आवश्यक औषधोपचार, औषधांचे नियमित सेवन, उपचारांमधील सातत्य आणि पुढील वैद्यकीय देखभालीबाबत मार्गदर्शन केले. मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना केवळ औषधोपचारच नव्हे, तर योग्य समुपदेशन, आपुलकीने केलेला संवाद आणि सातत्यपूर्ण वैद्यकीय देखरेख यांचीही आवश्यकता असते, या दृष्टिकोनातून वैद्यकीय पथकाने लाभार्थ्यांची तपासणी केली.
मानवसेवा प्रकल्प हा रस्त्यावर निराधार, बेघर, कुटुंबापासून दुरावलेल्या तसेच मानसिक आजाराने ग्रस्त अवस्थेत आढळणाऱ्या महिला व पुरुषांसाठी हक्काचे घर ठरत आहे. अनेक व्यक्ती विविध प्रतिकूल परिस्थितींमुळे रस्त्यावर येतात. काहींचा कुटुंबाशी संपर्क तुटलेला असतो, तर काहींना मानसिक आजारामुळे स्वतःची ओळख, कुटुंबाचा पत्ता किंवा आपल्या आयुष्याची माहिती सांगणेही शक्य होत नाही. अशा परिस्थितीत या व्यक्तींना आधार देत त्यांना सुरक्षित वातावरण, निवारा, भोजन, वस्त्र, स्वच्छता, वैद्यकीय उपचार आणि समुपदेशन अशा मूलभूत सुविधा मानवसेवा प्रकल्पामार्फत उपलब्ध करून दिल्या जातात.
या लाभार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य तपासणी ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून त्यांच्या आयुष्यात पुन्हा आशेचा किरण निर्माण करणारी महत्त्वपूर्ण संधी आहे. नियमित औषधोपचार, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि योग्य काळजी यांच्या माध्यमातून त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर लाभार्थ्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेणे, कुटुंबाशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करणे आणि परिस्थितीनुसार त्यांचे कुटुंबात पुनर्वसन करणे यासाठीही प्रकल्प सातत्याने प्रयत्नशील आहे.
एखाद्या व्यक्तीला रस्त्यावरून सुरक्षित निवाऱ्यात आणणे ही मानवसेवेची सुरुवात असते; मात्र त्या व्यक्तीला पुन्हा मानसिकदृष्ट्या सक्षम करून तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवणे आणि समाजात सन्मानाने जगण्याची संधी मिळवून देणे हेच या कार्याचे खरे उद्दिष्ट आहे. याच भावनेतून मानवसेवा प्रकल्प अहोरात्र निराधार मनोरुग्ण महिला व पुरुषांच्या सेवेत कार्यरत आहे.
मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना वेळेवर उपचार मिळणे, त्यांच्या आरोग्यातील बदलांचे नियमित निरीक्षण होणे आणि औषधोपचारांमध्ये खंड पडू नये, यासाठी अशा शिबिरांचे आयोजन केले जाते. जिल्हा मानसिक आरोग्य विभागाने मानवसेवा प्रकल्पात येऊन लाभार्थ्यांची तपासणी केल्यामुळे मनोरुग्णांना उपचार मिळण्यास मदत झाली. या उपक्रमासाठी संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प समन्वयक कु. प्रसाद माळी, सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र दुधवडे, परिचारिका शोभा मेंगाळ, सामाजिक कार्यकर्त्या नीलम घुंगरे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब घुंगरे आणि जनसंपर्क अधिकारी सोमनाथ बर्डे यांनी विशेष सहकार्य केले.

