• Wed. Nov 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

‘ध चा मा’ ते ‘12 चे 16’! धारणालयाच्या दिवाळखोरीविरोधात घंटानाद आंदोलन

ByMirror

Nov 25, 2026
गोकुळमधील बहुमताच्या वादावर पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा एल्गार;

गोकुळमधील बहुमताच्या वादावर पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा एल्गार;


‘12 चे 16 ओळखा आणि शेजाऱ्याला कळवा’ या घोषणेतून करणार जनजागृती!


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पेशवाईच्या इतिहासात ‘ध चा मा’ ही कथा आजही सत्तेच्या दुरुपयोगाचे प्रतीक म्हणून सांगितली जाते. आता कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील ‘12 चे 16’ या नव्या राजकीय अंकगणितामुळे सहकारातील लोकशाही, बहुमताचा आदर आणि घटनात्मक नैतिकता यांविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेने केला आहे. या पार्श्वभूमीवर ‘12 चे 16 ओळखा आणि शेजाऱ्याला कळवा’ हा संदेश घेऊन घंटानाद आंदोलन करण्याचा निर्धार संघटनांच्या वतीने व्यक्त करण्यात आला असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.


पेशवाईच्या इतिहासातील नारायणराव पेशव्यांच्या हत्येशी संबंधित ‘ध चा मा’ ही प्रसिद्ध कथा सत्तेच्या संघर्षाची आठवण करून देते. त्या कथेतील आदेशफेरफाराच्या आरोपांची ऐतिहासिक सत्यता हा स्वतंत्र संशोधनाचा विषय असला, तरी आज गोकुळ दूध संघाच्या प्रकरणाने एका वेगळ्याच स्वरूपातील बहुमताचा वाद समाजासमोर आणला आहे.
गोकुळच्या 25 निर्वाचित संचालकांपैकी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीला 13 आणि महायुती समर्थकांना 12 जागा मिळाल्या. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने 6 नोव्हेंबर 2026 रोजी काढलेल्या अध्यादेशाच्या आधारे चार शासननियुक्त संचालकांना मताधिकार मिळाला. परिणामी 10 नोव्हेंबरच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजेश पाटील यांचा 16 विरुद्ध 13 मतांनी विजय झाला. निर्वाचित संचालकांच्या 12 मतांमध्ये चार शासननियुक्त मते मिळाल्याने तयार झालेले 16 चे बहुमत हे सहकारी लोकशाहीच्या नैतिक कसोटीवर तपासले पाहिजे, अशी संघटनांची भूमिका आहे.


पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या मते, एखाद्या निर्णयाला कायद्याचा आधार असणे आणि तो घटनात्मक नैतिकतेशी सुसंगत असणे, या दोन स्वतंत्र कसोट्या आहेत. भारतीय समाजाच्या सामूहिक धारणालयात लोकभक्ती, ज्ञानभक्ती, कर्मभक्ती, घटनात्मक नैतिकता आणि कायद्याचे राज्य या मूल्यांची जोपासना झाली पाहिजे. मात्र सार्वजनिक निर्णयप्रक्रियेत लोकहितापेक्षा सत्ताहिताला प्राधान्य मिळत असल्याची भावना निर्माण झाली, तर ती ‘धारणालयाची दिवाळखोरी’ असल्याचे संघटनांचे म्हणने आहे.


अशा परिस्थितीत RECONSCIO अर्थात विवेकाधिष्ठित शासनतत्त्व समाजातील नैतिक जागरूकता वाढविण्यासाठी आवश्यक आहे. घंटानाद म्हणजे लोकशाहीच्या विवेकाला जागविण्याचा प्रतीकात्मक प्रयत्न केला जाणार असल्याची भूमिका संघटनांनी मांडली आहे.


गोकुळच्या प्रकरणातील अध्यादेश, शासननियुक्त संचालकांचा मताधिकार आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींचे बहुमत या प्रश्नांवर सार्वजनिक चर्चा व्हावी, या उद्देशाने घंटानाद आंदोलनाचा संकल्प करण्यात आला आहे. दरम्यान, शासनाच्या भूमिकेनुसार गणपूर्तीअभावी सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनात निर्माण होणारी कोंडी टाळणे हा अध्यादेशाचा उद्देश आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने अध्यादेशाला अंतरिम स्थगिती दिलेली नसून त्याच्या वैधतेचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे या वादाचा अंतिम कायदेशीर निकाल न्यायालयीन प्रक्रियेतूनच ठरणार आहे. तथापि, कायदेशीर वैधतेबरोबरच सहकारातील लोकशाही मूल्यांची सार्वजनिक चिकित्सा होणेही आवश्यक असल्याची संघटनांची भूमिका आहे. या आंदोलनासाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, राहुल आढाव, बाळासाहेब पालवे, आनंद आढाव, अशोक भोसले, पोपट भोसले, वीर बहादुर प्रजापती, अभिमान शिंदे, बाबासाहेब भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *