नमोह फुटबॉल क्लबच्या पाचव्या सिझनचा थरार 21 व 22 नोव्हेंबरला
105 खेळाडूंचा सहभाग, आठ संघांमध्ये रंगणार चुरस
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील फुटबॉल खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देत त्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देणाऱ्या अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग (ए.एफ.एस.एल.) 2026 च्या पाचव्या सिझनसाठी खेळाडूंचा लिलाव नुकताच उत्साहात पार पडला. या लिलावात शहरातील गुणवंत फुटबॉलपटूंवर संघमालकांनी लाखो रुपयांची बोली लावली. विशेष म्हणजे, काही खेळाडूंसाठी तब्बल 20 लाख रुपयांपर्यंत बोली लागल्याने यंदाच्या स्पर्धेची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
नमोह फुटबॉल क्लबच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. नमोह फुटबॉल क्लबच्या ओनर नमिता फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्थानिक खेळाडूंना व्यावसायिक पद्धतीने खेळण्याची संधी मिळावी, त्यांच्यातील कौशल्याला प्रोत्साहन मिळावे आणि शहरात फुटबॉल संस्कृती अधिक बळकट व्हावी, हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. यंदा या स्पर्धेचे पाचवे पर्व रंगणार आहे.
शहरात नुकत्याच झालेल्या खेळाडू निवड व लिलाव प्रक्रियेत आठ संघांच्या मालकांनी सहभाग घेत आपल्या पसंतीच्या खेळाडूंना संघात स्थान देण्यासाठी चढाओढ केली. या लिलावाचे सूत्रसंचालन सनीत मुथा यांनी केले. विद्यादान सायन्स अकॅडमी, गुलमोहर स्पोर्ट्स क्लब, नवा मराठा न्यूज, डीइसी बेअरिंग, एमडी अँड आरडीएक्स, प्रॉस्प ऑरा आणि डॉक्टर बायो यांच्या वतीने खेळाडूंसाठी बोली लावण्यात आली.
यंदाच्या स्पर्धेत एमडी अँड आरडीएक्स इन्फ्रा, गुलमोहर चॅलेंजर्स, गांधी वॉरियर्स, डायनामिक स्ट्रायकर, एक्सलन्स अचिव्हर्स, विद्यादान अल्फा एक्स, डॉक्टर बायो आणि नवा मराठा योद्धा असे आठ संघ मैदानात उतरणार आहेत. या संघांमध्ये शहरातील 105 खेळाडूंचा समावेश असून, प्रत्येक संघाने आपली ताकद वाढविण्यासाठी गुणवंत खेळाडूंची निवड केली आहे.
लिलावामध्ये खेळाडूंवर एक लाख रुपयांपासून ते तब्बल 20 लाख रुपयांपर्यंत बोली लावण्यात आली. आयुष गाडळकर, यदुवर कोकरे आणि भार्गव पिंपळे या खेळाडूंवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. आयुष गाडळकर याच्यासाठी गांधी वॉरियर्स, यदुवर कोकरे याच्यासाठी डायनॅमिक स्ट्रायकर, तर भार्गव पिंपळे याच्यासाठी विद्यादान अल्फा एक्स संघाने सर्वाधिक बोली लावली. या लिलावामुळे स्थानिक फुटबॉलपटूंच्या गुणवत्तेला मिळणारी व्यावसायिक मान्यता आणि त्यांच्या खेळाचे वाढते महत्त्व अधोरेखित झाले आहे.
दरम्यान, स्पर्धेसाठी विजेत्या संघाकरिता तयार करण्यात आलेल्या चषकाचे अनावरण नमिता फिरोदिया यांच्या हस्ते उपस्थित संघमालक आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी संघमालक म्हणून ऋत्विक वाबळे, जोएब खान, चेतन गांधी, सिद्धार्थ मुनोत, आशिष टोटू, रोहित रामदिन, सचिन सेलोत, ॲड. ललित गुंदेचा, अभिनंदन आणि रुही भन्साळी यांच्यासह त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीगचे सामने येत्या 21 व 22 नोव्हेंबर रोजी नगर क्लबच्या मैदानावर रंगणार आहेत. दिवस आणि रात्र अशा दोन सत्रांमध्ये ही स्पर्धा खेळविण्यात येणार असून, फुटबॉलप्रेमींना स्थानिक खेळाडूंचा दमदार खेळ अनुभवता येणार आहे. आठ संघांमधील चुरस, खेळाडूंचे कौशल्य आणि विजेतेपदासाठीची धडपड यामुळे यंदाच्या स्पर्धेत चांगलीच रंगत निर्माण होणार आहे.
या स्पर्धेचे कोपॉवर अभिनंदन आणि रुही भन्साळी (अवित्री मोटशन), किट स्पॉन्सर राजेश भंडारी (महावीर ग्रुप) आणि को स्पॉन्सर प्रणिल मुनोत (कॉनप्लेक्स) आहे. तसेच राम एजन्सी, शिवम सायकल, फन्की लॅण्ड, अमित ट्रेडर्स, जलाराम फुड्स व खेलोफाय यांचे सहकार्य लाभले आहे. स्थानिक खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही लीग अहिल्यानगरच्या फुटबॉल विश्वाला नवी दिशा देणारी ठरत आहे.
—
स्थानिक फुटबॉलपटूंना मोठे व्यासपीठ देण्याचा प्रयत्न! -नमिता फिरोदिया
अहिल्यानगरमधील फुटबॉल खेळाडूंमध्ये गुणवत्ता आणि जिद्दीची कमतरता नाही. मात्र, या खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी योग्य संधी आणि व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून नमोह फुटबॉल क्लबच्या माध्यमातून नमिता फिरोदिया यांनी अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीगची संकल्पना पुढे आणली. दरवर्षी आयोजित होणाऱ्या या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना संघमालकांसमोर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. लाखो रुपयांच्या बोलीद्वारे खेळाडूंची निवड होणे, ही त्यांच्या मेहनतीला आणि कौशल्याला मिळणारी पोचपावती आहे. यंदाच्या पाचव्या सिझनमध्ये 105 खेळाडू आणि आठ संघांचा सहभाग ही या स्पर्धेची वाढती लोकप्रियता दिसत असल्याची भावना नमिता फिरोदिया यांनी व्यक्त केली.

