ग्रंथमंदिर, कलामंदिर, कृतज्ञतेचं घर आणि माइंड टॉकीजचा शुभारंभ; वाचन, कला, कृतज्ञता अन् चित्रपटांतून मनाचे आरोग्य जपणार
पद्मश्री डॉ. मोहन आगाशे, डॉ. विद्याधर वाटवे, डॉ. सुजल वाटवे व खासदार लंके यांची उपस्थिती
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मानसिक आरोग्य म्हणजे केवळ आजारांवर उपचार नव्हे, तर मनाला समजून घेणे, भावनांना अभिव्यक्ती देणे आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देणे, या व्यापक विचारातून मनोग्रामने एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात मानसिक आरोग्याची मशागत या अभिनव संकल्पनेवर आधारित मनोग्राम, शिराढोण (ता. नगर) येथे मानसिक आरोग्य संवर्धन आणि पुनर्वसनासाठी चार नावीन्यपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. पद्मश्री डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विद्याधर वाटवे आणि डॉ. सुजल वाटवे यांच्या हस्ते ग्रंथमंदिर, कलामंदिर, कृतज्ञतेचं घर आणि माइंड टॉकीज या उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. तर या प्रकल्पाला खासदार निलेश लंके यांनी भेट दिली.
मनोग्राम हा केवळ मानसिक आजारांनी ग्रस्त आणि निराधार व्यक्तींच्या पुनर्वसनाचा प्रकल्प नसून, त्यांना प्रेम, आपुलकी, सन्मान आणि स्वावलंबनाच्या बळावर समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा अभिनव सामाजिक प्रयोग आहे. निसर्ग, शेती, कला, उपचार आणि समुदाय या पंचसूत्रीवर आधारित या प्रकल्पातून मानसिक स्वास्थ्य, व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास आणि सामाजिक समावेशनासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच संकल्पनेचा विस्तार म्हणून चार स्वतंत्र उपक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे.
वाचन ही केवळ ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया नसून मनाला समृद्ध करणारी आणि विचारांना सकारात्मक दिशा देणारी शक्ती आहे. हीच भूमिका लक्षात घेऊन ग्रंथमंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. पुस्तकांच्या माध्यमातून वाचनसंस्कृती विकसित करणे, विचारविश्व समृद्ध करणे, मानसिक ताणतणावातून सकारात्मकतेकडे वाटचाल करण्यास मदत करणे आणि मानसिक स्वास्थ्य जपण्याची प्रेरणा देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पुस्तकांच्या सहवासातून मनाला नवी ऊर्जा आणि विचारांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न येथे केला जाणार आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या मनात अनेक भावना, विचार आणि अनुभव दडलेले असतात. त्यांना व्यक्त होण्यासाठी योग्य माध्यम मिळणे आवश्यक असते. कलामंदिराच्या माध्यमातून चित्रकला, संगीत, नाट्य आणि इतर कलाप्रकारांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. कलेच्या माध्यमातून मनातील भावना व्यक्त करणे, सर्जनशीलतेला वाव देणे, आत्मविश्वास वाढविणे आणि मानसिक स्वास्थ्याला बळकटी देणे, अशी या उपक्रमाची संकल्पना आहे. कला ही मानसिक आरोग्य संवर्धनासाठी प्रभावी माध्यम ठरू शकते, हा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात माणसांमधील नातेसंबंध, प्रेम, जिव्हाळा आणि कृतज्ञतेची भावना जपणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. आपल्या आयुष्यात प्रेम, आदर आणि आधार देणाऱ्या व्यक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञतेचं घर ही विशेष जागा निर्माण करण्यात आली आहे. आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या व्यक्तींची आठवण, त्यांच्याविषयीचा आदर आणि मनातील भावना व्यक्त करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. सकारात्मकता, भावनिक जिव्हाळा आणि मानवी नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा हा संवेदनशील प्रयत्न आहे.
चित्रपट आणि दृकश्राव्य माध्यमांच्या प्रभावी वापरातून मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी माइंड टॉकीज हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विशेषतः विद्यार्थी आणि तरुणांमध्ये मानसिक आजार, आत्महत्या प्रतिबंध, व्यसनमुक्ती, भावनिक स्वास्थ्य आणि मानसिक आरोग्याशी संबंधित विविध विषयांबाबत समज निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
चित्रपट, लघुपट आणि माहितीपटांच्या माध्यमातून मानसिक आरोग्यविषयक विषय प्रभावीपणे मांडले जाणार आहेत. चित्रपट प्रदर्शनानंतर संवादात्मक चर्चा आयोजित करून प्रेक्षकांना विषय समजून घेण्याची आणि आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात केवळ मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्ती या विषयांवर केंद्रित असलेले भारतातील पहिले चित्रपटगृह असल्याचा या उपक्रमाचा दावा आहे. त्यामुळे माइंड टॉकीजला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मनोरंजनासोबतच मानसिक आरोग्याचे शिक्षण आणि जनजागृती घडविणारे हे व्यासपीठ ठरणार आहे.
या कार्यक्रमात युमेता फाउंडेशन, रायगड सेवक समिती आणि नगर कॉलेज यांचा सक्रिय सहभाग लाभला. रायगड सेवक समितीचे अध्यक्ष निलेश पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या शौर्यपरंपरेचे तसेच शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याचे दर्शन उपस्थितांना घडले. नगर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे, डॉ. विद्याधर वाटवे आणि डॉ. सुजल वाटवे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मानसिक आरोग्य, कला, समाज आणि पुनर्वसन यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित करत मानसिक स्वास्थ्यासाठी संवेदनशील सामाजिक वातावरण आणि माणसांमधील संवादाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाला नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने उपस्थित होते. त्यांनी मनोग्रामच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. खासदार नीलेश लंके यांनीही मनोग्रामला आवर्जून भेट दिली. यावेळी त्यांनी डॉ. किरण चव्हाण आणि डॉ. सुप्रिया चव्हाण यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या. सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे कमलेश देवाळे, माधवन सर आणि बेदरकर यांचेही स्वागत व सत्कार करण्यात आला.
या संपूर्ण प्रकल्पाची संकल्पना आणि अंमलबजावणी डॉ. किरण चव्हाण आणि डॉ. सुप्रिया चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यावेळी मनोग्रामच्या संकल्पनेविषयी भावना व्यक्त करताना डॉ. किरण चव्हाण म्हणाले, “मनोग्रामच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून पाहिलेले एक स्वप्न आज प्रत्यक्षात साकार होत आहे. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना केवळ उपचारांचीच नव्हे, तर प्रेम, आपुलकी, सन्मान, अभिव्यक्ती आणि समाजाच्या सहवासाचीही गरज असते. निसर्ग, कला, वाचन, कृतज्ञता आणि संवाद यांच्या माध्यमातून मानसिक आरोग्याची एक नवी चळवळ उभी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इंजि. केतन क्षीरसागर, गणेश कावळे, हेमंत मुळे, सानू माधवन, रवी गोयल, अक्षय चव्हाण, ओंकार जाधव, गौरव जाधव, विराज अहिरे, श्रेयस गौरी यांच्यासह अनेक मित्र, सहकारी आणि स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.

