अहिल्यानगर जिल्हा ग्राहक आयोगात आभासी सुनावणीचा शुभारंभ
‘फिजिकल’ सुनावणी कमी होऊन भविष्यात ऑनलाइन न्यायप्रक्रियेकडे कल वाढणार – मुकेश शर्मा (अध्यक्ष, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई)
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्राहक आयोगामध्ये वाढत्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आभासी पद्धतीने (व्हिडिओ कॉन्फरन्स) सुनावणी प्रक्रिया ही काळाची गरज बनली आहे. वाढत्या तक्रारी आणि अपुरे मनुष्यबळ याची सांगड तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडविता येणार आहे. अहिल्यानगर जिल्हा सर्वात मोठा असून, विविध तालुक्यांतून सुनावणीसाठी येणे पक्षकार व वकिलांना काही वेळा शक्य होत नाही. अशा परिस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी शक्य होणार आहे. भविष्यात हळूहळू फिजिकल सुनावणी कमी होऊन ऑनलाइन सुनावणीकडे सर्वांचा कल राहणार असल्याचे प्रतिपादन राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबईचे अध्यक्ष मुकेश व्ही. शर्मा यांनी केले.
ग्राहकांच्या तक्रारींच्या सुनावणीची प्रक्रिया अधिक सुलभ, गतिमान आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने अहमदनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये आभासी पद्धतीने (व्हिडिओ कॉन्फरन्स) सुनावणी सेवेचा शुभारंभ राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबईचे अध्यक्ष मुकेश व्ही. शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला. टीव्ही सेंटर येथील प्रशासकीय इमारतीतील ग्राहक आयोगाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग (मुंबई) सदस्या पूनम महर्षी, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगचे अध्यक्ष सादिक अली बशीर सय्यद, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सदस्या चारू डोंगरे, संध्या कसबे, रजिस्ट्रार कविता कोमार, ग्राहक तक्रार निवारण आयोग वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सुनील मुंदडा आदींसह वकील बांधव व ग्राहक वर्ग उपस्थित होते.
पुढे बोलताना मुकेश व्ही. शर्मा म्हणाले की, महाराष्ट्रातील जिल्हास्तरावरील ग्राहक आयोगामध्ये सर्वात प्रथम आभासी पद्धतीने (व्हिडिओ कॉन्फरन्स) सुनावणी प्रक्रिया घेण्याचा मान अहिल्यानगरला मिळाला आहे. अशा पद्धतीने राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा सुरू करण्याचा मानस आहे. मात्र, या नियोजनापूर्वीच अहिल्यानगर जिल्हा ग्राहक आयोगाने स्वतःहून पुढाकार घेतला. मुंबई बेंचप्रमाणे येथे सेटअप करण्यात आल्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
प्रास्ताविकात ग्राहक तक्रार निवारण आयोग वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सुनील मुंदडा म्हणाले की, अहमदनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने व्हिडिओ कॉन्फरन्स सुनावणीद्वारे राज्यात एक वेगळा ठसा उमटविला आहे. शोषित, पीडित ग्राहकांच्या समस्या सोडविणे हेच ध्येय ठेवून कार्य सुरू आहे. कमीत कमी खर्चात आणि जलद स्वरूपात ग्राहकांना न्याय देण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सदस्या चारू डोंगरे म्हणाल्या की, सहकारी वर्ग आणि सर्व वकिलांच्या सहकार्याने जिल्हा ग्राहक आयोगामध्ये उत्तमपणे कार्य सुरू आहे. ज्येष्ठ वकील आणि पक्षकारांना सुनावणीसाठी लांबून येणे शक्य होत नाही. यासाठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगचे अध्यक्ष सादिक अली बशीर सय्यद यांनी पुढाकार घेऊन व्हिडिओ कॉन्फरन्स सुनावणीसाठी महत्त्वाचे योगदान दिले असून, ही सुविधा कार्यान्वित केली आहे. याचा सर्वाधिक लाभ ग्रामीण भागाला होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग (मुंबई) सदस्या पूनम महर्षी म्हणाल्या की, खेड्यापाड्यांपर्यंत न्यायव्यवस्था पोहोचविण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरणार आहे. वेळ महत्त्वाचा असून, सर्वांना लांबून वेळेत हजेरी लावता येत नाही. लांब असलेले, येणे शक्य नसलेले, आजारी असलेले तसेच विविध कारणांमुळे सुनावणीसाठी उपस्थित राहू न शकणाऱ्या व्यक्तींना यापुढे न्यायापासून वंचित रहावे लागणार नाही. व्हिडिओ कॉन्फरन्स सुनावणीद्वारे न्यायप्रक्रियेत गतिमानता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात ज्येष्ठ वकिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास शहर बार असोसिएशन उपाध्यक्ष ॲड. भाऊसाहेब घुले, सेंट्रल बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. फारुख शेख, सचिव ॲड. अभिजीत देशपांडे, कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. शिवाजी कराळे, ॲड. रविंद्र बेद्रे, ज्येष्ठ वकील ॲड. सुरेश लगड, ॲड. अशोक बंग, ॲड. शिरीष जोशी, ॲड. शिरीष गटने, ॲड. किशोर राऊत, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग वकील संघाचे उपाध्यक्षा ॲड. विद्या तांबोळी सदस्य गिरिजा गांधी, ॲड. योगेश कुलकर्णी, ॲड. अरुणा राशीनकर, ॲड. सुजाता कुमार, ॲड. संदीप मुळे, ॲड. शुभ्रा तांबोळी, ॲड. भावना नय्यर-आहुजा, ॲड. अंजली सरोदे, ॲड. सिद्धार्थ वाघमारे, ॲड. आदित्य घालमे, ॲड. कैवल्य उपासनी, ॲड. रणजीत टाकते, ॲड. संदीप वाघ, ॲड. फैजान बेग, ॲड. विलास कोतकर, ॲड. नितेश बनबेरु, ॲड. हरीश कल्याणी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. शुभांगी बाबर यांनी केले, तर आभार ॲड. सिद्धांत गांधी यांनी मानले.
–—
आभासी सुनावणीद्वारे सेवेचा शुभारंभ
राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबईचे अध्यक्ष मुकेश व्ही. शर्मा यांनी फित कापून तसेच प्रत्यक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेऊन आभासी सुनावणी सेवेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स यंत्रणेचे बारकावे तपासले. या सुविधेमध्ये आणखी योग्यता आणण्यासाठी त्यांनी आवश्यक सूचना केल्या. तसेच उपस्थित वकिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व प्रश्न जाणून घेतले.
–

