राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!; गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार
जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागपूर येथे पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय इंटर स्कूल रायफल शूटिंग स्पर्धेत अहिल्यानगरच्या वरुण कोल्हे याने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकाविले. 17 वर्षांखालील मुलांच्या ओपन साइड एअर रायफल प्रकारात त्याने हे यश संपादन केले. या कामगिरीच्या जोरावर वरुणची गोवा येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर आणि प्रियदर्शनी भगवती अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर यांच्या वतीने 23 ते 25 ऑक्टोबर 2026 या कालावधीत शालेय राज्यस्तरीय इंटर स्कूल रायफल शूटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील विविध विभागांतील शालेय नेमबाजांनी सहभाग नोंदविला. सहभागी खेळाडूंनी आपल्या नेमबाजी कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करत पदकांसाठी चुरशीची लढत दिली.
या स्पर्धेत वरुण कोल्हे याने आपल्या अचूक नेमबाजीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत कांस्यपदक मिळविले. राज्यस्तरावर मिळविलेल्या या यशामुळे त्याला राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली आहे. गोवा येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत तो अहिल्यानगरचे प्रतिनिधित्व करणार असल्याने त्याच्याकडून आगामी स्पर्धेतही चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
वरुणने मिळविलेल्या या यशाबद्दल अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने त्याचा गौरव करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांच्या हस्ते वरुणचा सत्कार करण्यात आला. वरुणला प्रशिक्षक अलीम शेख, ऋषिकेश दरंदले आणि सागर फाटके यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच क्लबच्या सेक्रेटरी सुनीता लिपने यांनी खेळाडूंच्या तयारीसाठी विशेष प्रयत्न केले.
वरुण कोल्हे याने मिळविलेल्या यशाबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे, अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गीते-पाटील, वरिष्ठ कक्ष अधिकारी लाड साहेब, सोल मॅडम, आमदार संग्राम जगताप, खासदार नीलेश लंके, क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, क्रीडा अधिकारी प्रियंका खिंडरे, संतोष वाबळे, कोमल वाकळे तसेच खेळाडूंच्या पालकांनी त्याचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

