पूर्वजांच्या जमिनीसाठी लढा ११ एकर २३ गुंठे जमिनीचा प्रश्न ऐरणीवर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील मौजे चिकणी खामगाव येथील पूर्वजांची प्रकल्पबाधित जमीन वारसांना कसण्यासाठी मिळावी, तसेच कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, या मागण्यांसाठी शेरे कुटुंबीयांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले. जमिनीच्या हक्काचा प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणीही उपोषणकर्त्यांनी केली आहे.
चिकणी खामगाव येथील गट क्रमांक ५५/२ ड आणि ५६/३ मधील ‘महार हडोळे’ या नावाने उल्लेख असलेली ११ एकर २३ गुंठे प्रकल्पबाधित जमीन १९६६ च्या शासन निर्णयानुसार वारसांना कसण्यासाठी देण्यात यावी, अशी शेरे कुटुंबीयांची प्रमुख मागणी आहे. पूर्वजांच्या जमिनीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालून योग्य निर्णय घ्यावा, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी मांडली आहे.
या प्रकरणासंदर्भात आशाबाई गोपीनाथ शेरे, लीलाबाई शंकर सुखदान, गोरख गोपीनाथ शेरे, अमोल गोपीनाथ शेरे यांच्यासह कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित कुटुंबीयांच्या जीविताला धोका असल्याचे सांगत त्यांना पोलीस संरक्षण पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे.
पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यास विनयभंग आणि दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये खोट्या केसेस दाखल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून गावाबाहेर हाकलून देण्याची, नग्न धिंड काढण्याची धमकी दिल्याचे आणि कुटुंबीयांच्या निवाऱ्याच्या झोपड्या पाडण्यात आल्याचेही उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे.
या सर्व आरोपांची सखोल चौकशी करून संबंधितांविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गोरख शेरे, अमोल शेरे, आशाबाई शेरे आणि बाबासाहेब शेलार यांनी केली आहे.
जमिनीच्या हक्काचा प्रश्न आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा मुद्दा यावर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. १९६६ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने संबंधित जमीन अभिलेखांची तपासणी करून वारसांच्या मागणीबाबत योग्य कार्यवाही करावी, तसेच धमक्यांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे
या उपोषणाला चिकणी खामगाव येथील ग्रामस्थांसह अनेक नागरिकांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. जमीनविषयक मागणीचा न्याय्य निपटारा करून संबंधित कुटुंबीयांना सुरक्षित वातावरण मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या वेळी ललिताबाई सुखदान, आयुष शेरे, शिवाजी शेरे, हरिभाऊ लहाने, बबन आल्हाट, संजय मोहिते, रवी भुजंग, गोविंद सरोदे, विकी खरात, अमोल खरात, साहिल तेलघुने, प्रदीप खंडागळे, कृष्णा शेलार, मायकल गायकवाड, विशाल सोनवणे, संदीप राजगुरू, रोहन बोरुडे, यश गायकवाड यांच्यासह चिकणी खामगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

