वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेच्या वतीने पुरस्काराने गौरव
२०२५-२६ च्या हंगामातील उत्कृष्ट कामगिरीची दखल; महिला फुटबॉलमध्ये अहिल्यानगरचा नावलौकिक उंचावला
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील प्रतिभावान महिला फुटबॉलपटू सुमय्या शेख हिने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेच्या (Western India Football Association – WIFA) वतीने दिला जाणारा २०२५-२६ हंगामातील वरिष्ठ महिला गटाचा ‘वर्षातील सर्वोत्तम खेळाडू’ पुरस्कार पटकावला आहे. मुंबई येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात तिच्या या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला.
सुमय्याने संपूर्ण हंगामात राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरविद्यापीठीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी केली. तिच्या खेळातील कौशल्य, गोल करण्याची क्षमता आणि संघाच्या यशात दिलेले योगदान यांची दखल घेत तिला या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
२०२५-२६ च्या हंगामात सुमय्याने लोणावळा येथे झालेल्या महाराष्ट्र वरिष्ठ क्लब राज्य लीग स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या क्रीडा प्रबोधिनी संघाचे प्रतिनिधित्व केले. केरळ येथे झालेल्या इंडियन वुमेन्स लीग (IWL) २ स्पर्धेत तसेच बंगळुरू येथे झालेल्या IWL २ अंतिम फेरीतही तिने सहभाग नोंदविला. जळगाव येथे झालेल्या आंतरजिल्हा स्पर्धेत अहिल्यानगर संघाने तृतीय स्थान मिळविले, तर सुमय्याने या स्पर्धेत सर्वाधिक गोल करून स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरण्याचा मान मिळविला.
आंतरविद्यापीठीय फुटबॉल स्पर्धांमध्येही तिने आपल्या कामगिरीची छाप पाडली. मध्य प्रदेश येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात तिचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यानंतर तामिळनाडू येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने उपविजेतेपद पटकावले. पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेतही सुमय्या सर्वाधिक गोल करणारी खेळाडू ठरली.
राज्यस्तरीय लीगपासून ते राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांपर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी, दोन महत्त्वाच्या स्पर्धांमधील सर्वोच्च गोलसंख्येचा बहुमान आणि संघाच्या यशात दिलेले योगदान या कामगिरीमुळे सुमय्याने वरिष्ठ महिला फुटबॉलमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. क्रीडा प्रबोधिनी पुणे संघात समावेश होण्यापूर्वी सुमय्या हिचे प्रशिक्षण गुलमोहर फुटबॉल क्लब अहिल्यानगर येथे झाले असून, तिच्या यशामध्ये गुलमोहर फुटबॉल क्लब चे मोठे योगदान आहे.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेकडून मिळालेला हा पुरस्कार तिच्या मेहनतीची पावती आहे. सुमय्याच्या या यशामुळे अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या यशाने जिल्ह्यातील उदयोन्मुख महिला फुटबॉलपटूंना निश्चितच प्रेरणा मिळेल असे मनोगत अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केले आहे. तसेच वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, खालिद सय्यद, अमरजित सिंग शाही, सचिव रोनप फर्नांडिस, सहसचिव व्हिक्टर जोसेफ, प्रदीप जाधव, खजिनदार रिशपालसिंग परमार, सहखजिनदार रणबीरसिंग परमार, सदस्य राजू पाटोळे, गुलमोहर फुटबॉल क्लबचे अध्यक्ष जोहेब खान यांनी सुमैय्या शेख हिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (ADFA) सर्व सदस्यांनी सुमय्या शेख हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे अभिनंदन केले आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त केली.

