‘आदिवासी जमीन असूनही परक्याच्या नावावर पिक-पाणी नोंद कशी?’; सत्यशोधक अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे उपोषण
शासकीय जमीनीवर लाभार्थी आदिवासी ऐवजी लावले इतर समाजातील व्यक्तींचे नावे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील पुणेवाडी येथील आदिवासी समाजाच्या शासकीय जमिनीवर इतर समाजातील व्यक्तींनी पिक-पाणी नोंद लावल्याचा आरोप करीत ही नोंद तातडीने रद्द करावी, तसेच संबंधित जमिनीची चौकशी करून मूळ लाभार्थ्यांच्या वारसांची नोंद करण्यात यावी, या मागणीसाठी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. संबंधित प्रशासनाला एक महिन्यापूर्वी निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नामदेव चांदणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, मातंग एकता आंदोलन जिल्हाकार्याध्यक्ष संतोष शेलार, सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ उमाप, संजय पठारे, रामदास साळवे, राजू आल्हाट, रवी साळवे, अविनाश उमाप, निखिल मोरे, सतीश साळवे, बाबाजी साळवे, प्रमोद आरणे, शिवाजी दळवी, कडूबाबा लोंढे, भगवान नवगिरे, साधना मोरे, हिराबाई गोरखे, अशोक भोसले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलकांनी दिलेल्या निवेदनानुसार, पुणेवाडी (ता. पारनेर) येथील खंडू बहिरू कोळी हे भटक्या-विमुक्त आदिवासी समाजातील होते. त्यांच्या उपजीविकेसाठी महाराष्ट्र शासनाकडून सन 1930 मध्ये गट क्रमांक 2497 ही शासकीय जमीन देण्यात आली होती. त्यानंतर संबंधित कुटुंब या जमिनीवर शेती करून आपला उदरनिर्वाह करीत होते. मात्र जमीन कोरडवाहू असून शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने अनेकदा पिके नष्ट होत आणि कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याने खंडू कोळी व त्यांच्या पत्नीने मोलमजुरी करण्यास सुरुवात केली. मुलांच्या शिक्षणासाठी तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी पुणेवाडी सोडून सातारा येथे स्थलांतर केल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. तेथेही पती-पत्नीने मोलमजुरी करून मुलांना शिक्षण दिले. खंडू कोळी यांचे 11 जानेवारी 1970 रोजी निधन झाले, तर त्यांच्या पत्नी सोनाबाई खंडू कोळी यांचे 3 डिसेंबर 2001 रोजी निधन झाले. यानंतर त्यांच्या मुलगा शिवाजी खंडू कोळी व मुलगी हौसाबाई सोनबा मोरे यांनी वडिलांच्या नावावर असलेल्या गट क्रमांक 2497 या शासकीय जमिनीवर वारस नोंद करण्यासाठी तहसीलदार कार्यालय, पारनेर येथे संपर्क साधला. त्यावेळी या जमिनीवर इतर व्यक्तींच्या नावाने पिक-पाणी नोंद करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, कुंभारवाडी येथील दोन व्यक्तींवर संबंधित आदिवासी जमिनीवर पिक-पाणी नोंद लावल्याचा आरोप आहे. याबाबत विचारणा केली असता धमकी देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित जमिनीवरील पिक-पाणी नोंद कोणत्या आधारावर व कोणत्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी संबंधित जमिनीची नोंद कोणत्या प्रक्रियेतून केली, याची चौकशी करून बेकायदेशीररीत्या झालेली नोंद तातडीने रद्द करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच शिवाजी खंडू कोळी व हौसाबाई सोनबा मोरे यांच्या नावाने कायदेशीर वारस नोंद करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

