नव्या पिढीला उर्दू साहित्याशी जोडण्याचा संकल्प
संस्था अदब-ए-इस्लामी अहमदनगरचा पुढाकार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- संस्था अदब-ए-इस्लामी, अहमदनगर शाखेच्या वतीने शहरातील हातमपुरा येथील जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या कार्यालयात उर्दू काव्यसंमेलन उत्साहात पार पडले. या साहित्यिक मैफलीत शहरातील नामवंत उर्दू शायरांनी आपला निवडक काव्यसंग्रह सादर केला. उपस्थित रसिकांनी शायरांच्या काव्याला उत्स्फूर्त दाद देत कार्यक्रमाचा आनंद घेतला.
या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक व कवी प्रा. नदीम बीजापुरी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्था अदब-ए-इस्लामीचे नाझिम-ए-अदबियात, तखलीक व तहकीक जनाब मुनव्वर हुसेन यांनी शायरीने करुन उपस्थितांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमात प्रा. नदीम बीजापुरी, आसिफ अहमद आसिफ, बिलाल अहमदनगरी, मकबूल अहमदनगरी, मुश्ताक अहमद मुश्ताक सर आणि मुनव्वर हुसेन अहमदनगरी यांनी आपले काव्य सादर केले. त्यांच्या काव्यात समकालीन जाणीव, नैतिक मूल्ये, सामाजिक भान तसेच उर्दू भाषा व साहित्याची समृद्धता आणि सौंदर्य प्रकर्षाने जाणवले. उपस्थित श्रोत्यांनी सर्व शायरांच्या काव्याला उत्स्फूर्तपणे टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संस्था अदब-ए-इस्लामीचे नाझिम-ए-अदबियात, तखलीक व तहकीक जनाब मुनव्वर हुसेन छोटे खान यांनी संस्थेच्या आगामी साहित्यिक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी त्यांनी घोषणा केली की, “यावर्षी नव्या पिढीला उर्दू साहित्याशी जोडणे” हे संस्था अदब-ए-इस्लामीच्या प्रमुख प्राधान्यक्रमांपैकी एक राहणार असून, यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.
नव्या पिढीमध्ये उर्दू भाषा व साहित्याबद्दल आवड निर्माण करण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये आणि वस्त्यांमध्ये जाऊन साहित्यिक मैफली, काव्यसंमेलने तसेच विविध साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून उर्दू साहित्याच्या प्रसाराचे कार्य समाजातील व्यापक घटकांपर्यंत, विशेषतः तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उर्दू भाषा व साहित्याच्या संवर्धनासाठी संस्था अदब-ए-इस्लामीच्या वतीने भविष्यातही विविध साहित्यिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

