वाशी येथे 3 ऑक्टोबरला रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन सोहळा; रामदास आठवले करणार मार्गदर्शन
रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 69व्या वर्धापन दिनानिमित्त 3 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्य मंदिरात दुपारी 1 वाजता वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रमात समावेश आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातूनही पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी दिली.
राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सरचिटणीसअविनाश मातेकर, राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी सीमाताई आठवले, युवा नेते
जीत आठवले, राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे,
कार्याध्यक्ष बाबुराव कदम, केंद्रीय कार्याध्यक्ष कांतीकुमार जैन, राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव , राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे,
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड, युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्यासह पक्षाचे केंद्रीय, राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित रिपब्लिकन पक्षाची संघटनात्मक वाटचाल अधिक व्यापक करण्यावर या वर्धापन दिन सोहळ्यात भर दिला जाणार आहे. पक्षाची संघटनात्मक भूमिका, देशभरातील विस्तार आणि आगामी काळातील पक्षवाढीबाबतही यावेळी मार्गदर्शन होणार आहे.
रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा देशातील विविध भागांत पोहोचविण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या संघटनात्मक कामाचा आढावा घेण्याबरोबरच पक्षाची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या निमित्ताने करण्यात येणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने वाशी येथे होणाऱ्या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी केले आहे.

