क्लेरा ब्रुसमध्ये भरवली जाते इंग्रजी शाळा; चौकशी करण्याची शिवसेना सामाजिक न्याय विभागाची मागणी
क्लेरा ब्रुस शाळेचा ऐतिहासिक वारसा जपण्याची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील ऐतिहासिक क्लेरा ब्रुस बॉईज ॲण्ड गर्ल्स हायस्कूलचे जतन करून तिचा शैक्षणिक व ऐतिहासिक वारसा अबाधित ठेवावा. तसेच सदर परिसरात सुरू असलेल्या ‘इंग्रजी शाळेची’शासकीय मान्यता, परवानगी, नोंदणी व कायदेशीर स्थितीची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांना दिले.
यावेळी शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, शहरप्रमुख आकाश पंचमुख, पोपटराव पाथरे, ज्ञानेश्वर घोरपडे, अशोक दोंदे, प्रमोद जंजाळे, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाचे उपाध्यक्ष दीपक कांबळे, संजय पाठक आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, क्लेरा ब्रुस बॉईज ॲण्ड गर्ल्स हायस्कूलची सुरुवात मिशनरीच्या वतीने सन 1838 मध्ये झाली. त्यामुळे या संस्थेला शहराच्या शैक्षणिक इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीशिक्षणाच्या कार्याशी संबंधित ऐतिहासिक संदर्भही या संस्थेशी जोडले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे केवळ एक शाळा म्हणून नव्हे, तर सामाजिक व शैक्षणिक परिवर्तनाच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा ठेवा म्हणून क्लेरा ब्रुस बॉईज ॲण्ड गर्ल्स हायस्कूलकडे पाहण्याची गरज असल्याचे शिवसेना सामाजिक न्याय विभागाने म्हटले आहे. या शाळेचे अस्तित्व अबाधित ठेवून तिचा ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत जतन करण्यासाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनानुसार, सदर परिसरात एका स्वयंघोषित ट्रस्टीच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाने तसेच एका दाम्पत्याच्या सहकार्याने ‘इंग्रजी’ शाळा सुरू असल्याची माहिती आहे. या शाळेला आवश्यक शासकीय मान्यता, परवानगी, नोंदणी तसेच अन्य कायदेशीर बाबींबाबत तक्रारी असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. इंग्रजी शाळेची आवश्यक मान्यता व परवानग्यांशिवाय सुरू असल्याची माहिती असल्याने, शिक्षण विभागाने या प्रकरणाची तातडीने व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशीमध्ये संबंधित शाळा अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. इंग्रजी शाळा सुरू झाल्यामुळे ऐतिहासिक क्लेरा ब्रुस बॉईज ॲण्ड गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीसंख्येवर किंवा तिच्या अस्तित्वावर परिणाम झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
क्लेरा ब्रुस बॉईज ॲण्ड गर्ल्स हायस्कूल बंद करू नये व तिचे अस्तित्व अबाधित ठेवावे, शाळेचा ऐतिहासिक व शैक्षणिक वारसा जतन करण्यासाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात, इंग्रजी शाळेची मान्यता, परवानगी, नोंदणी व कायदेशीर स्थिती तपासावी, शिक्षण विभागामार्फत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, शाळा अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, सदर इंग्रजी शाळेमुळे क्लेरा बस शाळेच्या विद्यार्थीसंख्येवर झालेल्या परिणामाचा स्वतंत्र अहवाल तयार करण्याची मागणी शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना देखील पाठवण्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास 25 ऑक्टोबर 2026 रोजी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
‘क्लेरा बस शाळेचा ऐतिहासिक वारसा अबाधित राहिला पाहिजे’
क्लेरा बस बॉईज ॲण्ड गर्ल्स हायस्कूल ही अहिल्यानगरच्या शैक्षणिक इतिहासातील महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेचे अस्तित्व टिकवून तिचा ऐतिहासिक वारसा जतन करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. या ऐतिहासिक शाळेत इंग्रजी शाळा अनाधिकृतपणे भरवली जात असल्याने त्याचा परिणाम या ऐतिहासिक शाळेवर झाला आहे. याप्रकरणी प्रशासनाने तात्काळ चौकशी करावी. -विनोद साळवे (जिल्हाध्यक्ष, शिवसेना सामाजिक न्याय विभाग)

