• Fri. Oct 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगरच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलची राष्ट्रीय पातळीवर दखल

ByMirror

Oct 2, 2026
अहिल्यानगरच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलची राष्ट्रीय पातळीवर दखल

‘मिपा’च्या राज्यातील 100 निवडक शाळांच्या यादीत स्थान; ‘शिक्षण अनुभूती’ फ्लिप बुकमध्ये भाई सथ्था नाईट हायस्कूलचा समावेश-डॉ. पारस कोठारी


कौटुंबिक परिस्थितीमुळे, वारंवार अनुत्तीर्ण,विवाह लवकर झाल्याने शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिकस्तर

उंचावण्यासाठी त्यांना शाळेत प्रवेशित करण्यासाठी शिक्षण दूत योजना,रोजगार मेळावा, आर्थिकस्तर उंचावण्यासाठी कौशल्य

प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना मिळालेल्या नवी दिशा उपक्रमाची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर झळकली


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील हिंद सेवा मंडळ संचलित भाई सथ्था नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या रात्रशाळेच्या शैक्षणिक वाटचालीची आणि विद्यार्थीकेंद्रित नाविन्यपूर्ण उपक्रमांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थीहिताच्या दृष्टीने उल्लेखनीय शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या शाळांची माहिती संकलित करण्यात आली. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातून भाई सथ्था नाईट हायस्कूलचा समावेश करण्यात आला आहे.


या यशोगाथेचा समावेश राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (निपा), नवी दिल्ली यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या ‘शिक्षण अनुभूती’ या फ्लिप बुकमध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या निवडक 100 शाळांच्या यशोगाथांचा या उपक्रमात समावेश करण्यात आला असून, त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील भाई सथ्था नाईट हायस्कूलला स्थान मिळाले आहे.


राज्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास, कौशल्यविकास आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती संकलित करण्यात आली होती. या प्रक्रियेत निवडक शाळांच्या प्रभावी उपक्रमांची आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीची माहिती ‘शिक्षण अनुभूती’ या फ्लिप बुकच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.


अहिल्यानगर जिल्ह्यातून या निवडक यशोगाथांमध्ये भाई सथ्था नाईट हायस्कूलचा समावेश करण्यात आला असून, जिल्ह्यातून समाविष्ट झालेली राज्यातील ही एकमेव रात्रशाळा असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील इतर दोन जिल्हा परिषद शाळांचाही या उपक्रमात समावेश आहे. रात्रशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी लक्षात घेऊन केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर न देता त्यांना रोजगारक्षम बनविणे, विविध कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला चालना देणे, या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबविण्यात आले.
रात्रशाळेचे चेअरमन डॉ. पारस कोठारी म्हणाले की, भाई सथ्था नाईट हायस्कूलची यशोगाथा राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (निपा), नवी दिल्ली यांच्या ‘शिक्षण अनुभूती’ या फ्लिप बुकमध्ये समाविष्ट होणे ही संपूर्ण अहिल्यानगरसाठी अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांना रोजगाराभिमुख कौशल्ये आणि विविध व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष साजरे होत असताना रात्रशाळेच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाणे हे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याला खऱ्या अर्थाने अभिवादन आहे. प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश मिळाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


भाई सथ्था नाईट हायस्कूलचे प्राचार्य सुनील सुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये रोजगार मेळावे, विविध कौशल्य प्रशिक्षण उपक्रम, व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या आर्थिक स्तरात सुधारणा घडवून आणण्यासाठी आवश्‍यक मार्गदर्शन यांचा समावेश आहे.


रात्रशाळेत शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी दिवसभर रोजगार, व्यवसाय किंवा अन्य कामांमध्ये व्यस्त असतात. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाबरोबरच व्यावसायिक व कौशल्याधारित संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शाळेच्या माध्यमातून विविध उपक्रमांना चालना देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच रोजगाराच्या संधी, कौशल्यविकास आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्‍यक दिशा मिळण्यास मदत झाली. या विद्यार्थीकेंद्रित आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत भाई सथ्था नाईट हायस्कूलची यशोगाथा ‘शिक्षण अनुभूती’ या राष्ट्रीय स्तरावरील फ्लिप बुकमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष साजरे होत असताना भाई सथ्था नाईट हायस्कूलची यशोगाथा राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक उपक्रमात समाविष्ट होणे ही विशेष अभिमानाची बाब आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सर्वसामान्य, वंचित आणि शिक्षणापासून दूर असलेल्या घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचे कार्य केले. त्याच विचारांना पुढे नेत रात्रशाळा कामगार, कर्मचारी आणि विविध कारणांमुळे दिवसा नियमित शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जात असल्याचे प्राचार्य सुनिल सुसरे यांनी सांगितले.

रात्रशाळेत विविध उपक्रम राबविण्यासाठी माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती संध्या गायकवाड, योजना विभागाचे शिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब बुगे, मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण यांचे मार्गदर्शन लाभले तसेच उपक्रमांसाठी सहकार्य करणाऱ्या मासूम संस्थेच्या संचालिका श्रीमती निकिता केतकर तसेच जन शिक्षण संस्था, मिटकॉन या संस्थांचे विशेष आभार मानण्यात आले


शिक्षण अनुभूती या मध्ये रात्र शाळेची यशोगाथा प्रसिद्ध झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अँड. अनंत फडणीस, कार्याध्यक्ष अनंत देसाई, मानद सचिव सुमतीलाल कोठारी, संजय जोशी डॉ.रमेश झरकर,ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलालजी सारडा, अजितशेठ बोरा व सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी शालेय समितीचे चेअरमन, शालेय समिती सदस्य व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *