‘कौशल बोध’ मधून शिक्षकांना कौशल्याधारित शिक्षणाची नवी दिशा; चित्रकुट इंटरनॅशनल स्कूलमध्ये विशेष कार्यशाळा
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता त्यांना जीवनोपयोगी कौशल्यांचे शिक्षण देण्यासाठी सीबीएसई स्किल एज्युकेशन विभागाचा पुढाकार
अहिल्यानगर (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्याऐवजी त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष जीवनातील कौशल्ये, सर्जनशीलता, आत्मविश्वास, स्वावलंबन आणि श्रमाची प्रतिष्ठा रुजविण्याच्या उद्देशाने अहिल्यानगर शहरातील चित्रकूट इंटरनॅशनल स्कूल येथे शिक्षकांसाठी ‘कौशल बोध’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कौशल्याधारित आणि अनुभवाधारित शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याबाबत या कार्यशाळेत शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.
हे अधिकृत प्रशिक्षण सीबीएसईच्या स्किल एज्युकेशन युनिट, दिल्लीकडून आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी अशोक सचदेव यांची स्किल एज्युकेशन युनिटचे मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि सीबीएसईच्या वतीने त्यांनी हे प्रशिक्षण आयोजित करून घेतले. ‘कौशल बोध’ हा विषय यावर्षीपासून इयत्ता ६वी, ७वी आणि ८वीसाठी अधिकृतपणे अनिवार्य करण्यात आला आहे.
या कार्यशाळेसाठी श्रीमती स्वेक्षणा मित्रा आणि अशोक सचदेव यांनी मास्टर ट्रेनर म्हणून मार्गदर्शन केले. शिक्षकांचा सक्रिय सहभाग घेऊन विविध कृती, अनुभवाधारित उपक्रम, संवाद आणि चर्चांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यविकासाची प्रक्रिया अधिक परिणामकारक पद्धतीने कशी राबविता येईल, याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा केंद्रबिंदू केवळ परीक्षेतील गुण किंवा पाठ्यपुस्तकातील ज्ञान न राहता, त्यांना भविष्यातील आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास सक्षम करणे आवश्यक असल्याचे कार्यशाळेत अधोरेखित करण्यात आले. दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशील विचार, निर्णयक्षमता, संवादकौशल्य, सहकार्याची भावना, स्वावलंबन आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव या बाबी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यशाळेत मार्गदर्शन अशोक सचदेव म्हणाले की, शिक्षणाचा अंतिम उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांना जीवनातील विविध आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास सक्षम बनविणे हा आहे. कौशल्य हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून आत्मनिर्भरता आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा भक्कम पाया आहे. आजच्या बदलत्या काळात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता त्यांना जीवनोपयोगी कौशल्यांचे शिक्षण देणे आवश्यक आहे. ‘Learning for Marks’पासून ‘Learning for Life’कडे शिक्षणाचा प्रवास घडविण्यासाठी शाळांमध्ये कौशल्याधारित व अनुभवाधारित शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी गरजेची असल्याचे कार्यशाळेत त्यांनी स्पष्ट केले.
श्रीमती स्वेक्षणा मित्रा म्हणाल्या की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध कृतींमध्ये सहभागी करून घेत त्यांच्यातील सुप्त गुण आणि कौशल्ये ओळखणे, त्यांना प्रोत्साहन देणे तसेच प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्याबरोबरच स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेस अहिल्यानगर सहोदयच्या सचिव सौ. नम्रिता ओहरी तसेच अहिल्यानगर शहर समन्वयक श्रीमती जयश्री म्हेत्रे यांची विशेष उपस्थिती लाभली. ‘हुनर आहे, तर कदर आहे; कौशल्य आहे, तर आत्मविश्वास आहे आणि कुशल विद्यार्थी म्हणजे विकसित भारताची मजबूत पायाभरणी,’ असा प्रेरणादायी संदेश कार्यशाळेतून देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणामध्ये कौशल्य, अनुभव आणि प्रत्यक्ष कृती यांचा समावेश करण्याचे आवाहन करण्यात आले.या कार्यशाळेमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याधारित शिक्षणाची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी नवी दिशा, प्रेरणा आणि उपयुक्त साधने मिळाली. विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षण, रोजगार आणि जीवनातील आव्हानांसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने ‘कौशल बोध’सारखे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
ही कार्यशाळा सेक्शन ऑफिसर – सीओई, सीबीएसई सौ. पल्लवी माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. याबद्दल सीबीएसईच्या कौशल्य शिक्षण विभागाचे विशेष आभार मानण्यात आले.

