समता, सामाजिक न्याय आणि बंधुतेचा संदेश घेऊन राज्यभर ‘समता क्रांती मार्च’; अहिल्यानगर जिल्ह्यात जय्यत तयारी -अमित काळे
जाती-जातीतील संघर्षाला सलोख्याचा पर्याय देण्याचा रिपब्लिकन पक्षाचा प्रयत्न; शिर्डीतील सभेच्या नियोजनासाठी लवकरच बैठक
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राज्यभर ‘समता क्रांती मार्च’ आयोजित करण्यात आला आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली बुधवार, दि. 14 ऑक्टोबर ते रविवार, दि. 15 नोव्हेंबर 2026 या कालावधीत हा मार्च महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणार आहे.
या ‘समता क्रांती मार्च’चे 30 ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे आगमन होणार असून, त्यानिमित्त रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांची जाहीर सभा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे यांनी दिली.
‘समता क्रांती मार्च’चे राज्यभर नियोजन प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे, प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम व प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. शिर्डी येथे होणाऱ्या मार्चच्या आगमनाचा कार्यक्रम तसेच ना. रामदास आठवले यांच्या जाहीर सभेच्या नियोजनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक घेण्यात येणार आहे. या नियोजन बैठकीस जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, राज्य सचिव दीपक गायकवाड, विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय भैलुमे आणि शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती अमित काळे यांनी सांगितले.
भारतीय संविधान, सामाजिक न्याय, समता, बंधुता तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने ‘समता क्रांती मार्च’चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून विविध समाजांच्या आरक्षणाच्या मागण्यांसाठी सुरू असलेली आंदोलने तसेच अनुसूचित जातींच्या राखीव जागांमधील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेली आंदोलने यामुळे समाजा-समाजात आणि जाती-जातींमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा रिपब्लिकन पक्षाने केला आहे.
या पार्श्वभूमीवर विविध समाजघटकांमध्ये सलोखा, सामाजिक ऐक्य, समता आणि बंधुभाव निर्माण करण्याचा प्रयत्न ‘समता क्रांती मार्च’च्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. ‘समता क्रांती मार्च’चा राज्यव्यापी प्रारंभ बुधवार, दि. 14 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता सातारा येथील भीमाई स्मारक, सदर बाजार येथून होणार आहे. सातारा-कराड-पेठनाका मार्गे दुपारी 4 वाजता हा मार्च कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. यानंतर मेरी वेदर ग्राऊंड, एस.पी. ऑफिस रोड, कोल्हापूर येथे सायंकाळी 5 वाजता ‘जागतिक बौद्ध धम्म परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमास रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा ‘समता क्रांती मार्च’ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हाध्यक्षाने आपल्या जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाच्या राज्य व केंद्रीय कार्यकारिणीतील नेते, प्रमुख पदाधिकारी, विविध आघाड्यांचे नेते व कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन मार्चचा मार्ग निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मार्चच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये सकाळी 11 वाजता प्रारंभ, दुपारी भोजन तसेच सायंकाळी मुक्कामाच्या ठिकाणी मार्चच्या आगमनानिमित्त जाहीर सभा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि रात्रीच्या भोजनाचे नियोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन तसेच संबंधित शासकीय विभागांशी आवश्यक समन्वय साधण्याच्या सूचनाही जिल्हाध्यक्षांना देण्यात आल्या आहेत.
‘समता क्रांती मार्च’चा रविवार, दि. 15 नोव्हेंबर 2026 रोजी पुणे येथे समारोप होणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मार्चच्या समारोपाच्या दिवशी पुण्यातील फुलेवाडा, गंजपेठ येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना जाहीर अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता एस.एस.पी.एम.एस. कॉलेजचे मैदान, पुणे आर.टी.ओ.जवळ येथे ‘समता क्रांती मार्च’ची जाहीर समारोप सभा होणार आहे. या समारोप सभेस महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

