कृष्ण-राधेच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी वेधले लक्ष; प्रश्नमंजुषा व मनोरंजनात्मक स्पर्धांनी वाढवली रंगत
विजेत्या महिलांचा बक्षिसांनी गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रयास दादी-नानी ग्रुपच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला एकत्र आल्या होत्या. महिलांनी सामूहिकरित्या श्रीकृष्णाची भजने, गीते आणि भक्तिगीते सादर केल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्ण जन्माचा देखावा साकारण्यात आला होता.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका संध्या पवार, नगरसेविका गीतांजली काळे, प्रिया गुंदेचा-मुनोत, प्रयास ग्रुपच्या उपाध्यक्ष राजश्री शितोळे, सचिव तेजल शितोळे, दादी-नानी ग्रुपचे अध्यक्षा जयाताई गायकवाड, प्रयास ग्रुप अध्यक्ष रजनी भंडारी, ज्योती जोशी, स्वाती गुंदेचा, संस्थापिका अलकाताई मुंदडा, उपाध्यक्ष सुचेता बोरकर, खजिनदार मेघना मुनोत, वैशाली क्षीरसागर, सरस्वती झंवर, संपुर्णा देशमुख, सारिका रघुवंशी, नीता घावटे, ॲड. स्वाती जाधव, गीता कवाने, वर्षा गांधी, डॉ. योगीता चंगेडिया, सोहनी पुरनाळे, सुजाता कदम, अरुणा गोयल, उषा सोनी, सुशीला त्र्यंबके, लीला अग्रवाल, सुरेखा जंगम, उषा सोनटक्के, अलका वाघ, सुनीता काळे, संगीता दंडवाणी, रेखा फिरोदिया, जयश्री पुरोहित, आशा गायकवाड, उज्वला बोगावत, प्रतिभा रासकर, दीपा मालू, दीपा सोनी आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमात श्रीकृष्ण जन्माचा सुंदर आणि आकर्षक देखावा सादर करण्यात आला. फुलांनी व आकर्षक सजावटीने श्रीकृष्णाचा पाळणा सजविण्यात आला होता. जन्माष्टमीच्या पारंपरिक उत्साहात महिलांनी श्रीकृष्णाच्या पाळण्याला झोका देत भक्तिभाव व्यक्त केला. ‘गोविंदा’, ‘गोपाल’, ‘नंदलाला’च्या जयघोषाने वातावरण अधिकच मंगलमय झाले. काही चिमुकल्यांनी श्रीकृष्ण आणि राधेच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
महिलांनी सादर केलेल्या श्रीकृष्णाच्या भजनांमुळे कार्यक्रमात आध्यात्मिक आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले. भक्तिगीतांसोबतच महिलांनी विविध सांस्कृतिक उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग घेतला. जन्माष्टमी सोहळ्याच्या निमित्ताने महिलांसाठी सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यासोबतच विविध मनोरंजनात्मक तसेच बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धांचा आनंद लुटला. स्पर्धांच्या माध्यमातून महिलांच्या ज्ञानाला चालना देण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना आणि बुद्धिमत्तेला व्यासपीठ मिळाले. हसत-खेळत पार पडलेल्या या स्पर्धांमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. स्पर्धेतील विजेत्या महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
नगरसेविका संध्या पवार यांनी महिलांना शुभेच्छा देताना, भारतीय संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्यामध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. प्रिया गुंदेचा-मुनोत यांनी जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महिलांमध्ये आनंद, उत्साह आणि एकोप्याची भावना निर्माण होत असल्याचे सांगितले. राजश्री शितोळे यांनी प्रयास दादी-नानी ग्रुपच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, महिलांनी अशा कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. महिलांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांना आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देण्याचा ग्रुपचा सातत्याने प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपा मालू आणि दीपा सोनी यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार अलका मुंदडा यांनी मानले. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि भक्तिमय वातावरणात हा श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात संपन्न झाला.

