ग्रामसभेत दिलीप कांबळे यांचे निवेदन; तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात
विशेष ग्रामसभा घेण्याचे सरपंचांचे आश्वासन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) हद्दीत सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर व अवैध धंद्यांमुळे गावातील तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात आले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील अवैध धंदे समूळ नष्ट करून तरुणाईला व्यसनाच्या विळख्यातून वाचवावे, या मागणीसाठी ग्रामस्थ दिलीप कांबळे यांनी ग्रामसभेत निवेदन दिले. प्रशासन तसेच स्थानिक सत्ताधाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
अरणगाव परिसरात अवैध दारू विक्री, जुगार तसेच अन्य बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याने त्याचा थेट परिणाम गावातील सामाजिक वातावरणावर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः युवा वर्ग या गैरप्रकारांच्या आहारी जाण्याची शक्यता वाढल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अवैध धंद्यांना वेळीच आळा घातला नाही, तर त्याचे दूरगामी परिणाम गावाच्या सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेवर होऊ शकतात, अशी भीती कांबळे यांनी व्यक्त केली.
अवैध धंद्यांमुळे अरणगावातील शांततापूर्ण वातावरण धोक्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावाच्या विकासासाठी आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रशासनाने अशा गैरप्रकारांविरोधात ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कारवाई होणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. गावातील वाढता रोष आणि संताप लक्षात घेऊन सरपंच व ग्राम अधिकाऱ्यांनी अवैध धंद्यांच्या प्रश्नावर लवकरच ‘विशेष ग्रामसभा’ बोलावण्याचे आश्वासन दिले आहे.
अवैध दारू आणि जुगाराच्या विळख्यात अरणगावचे भविष्य असणारी तरुण पिढी अडकत असल्याचा गंभीर आरोप दिलीप कांबळे यांनी केला. प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप करून हे प्रकार बंद केले नाहीत, तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. “प्रशासन कारवाई करणार की गावकऱ्यांना कायदा हातात घ्यावा लागणार?” असा संतप्त सवाल कांबळे यांनी उपस्थित केला.
आगामी विशेष ग्रामसभेत प्रशासनाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी ठोस आणि कडक पावले उचलली नाहीत, तर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिलीप कांबळे यांनी दिला आहे. गावातील तरुणांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत आणि अरणगावला नशामुक्त व अवैध धंदेमुक्त करण्यासाठी प्रभावी मोहीम राबवावी, अशी मागणी त्यांनी केली.

