• Fri. Aug 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात रंगणार 6 सप्टेंबर रोजी ग्रामीण मराठी साहित्याचा जागर!

ByMirror

Aug 28, 2026
निमगाव वाघात रंगणार 6 सप्टेंबर रोजी ग्रामीण मराठी साहित्याचा जागर!

शिक्षक दिनानिमित्तचा उपक्रम; ग्रंथ दिंडी, परिसंवाद, व्याख्याने अन्‌ कवी संमेलनाची मेजवानी


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 6 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत आणि साहित्यप्रेमी एकवटणार आहे.


या साहित्य संमेलनाचे उद्घाटन शहर वाहतूक नियंत्रण शाखा, अहिल्यानगरचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते सामाजिक, साहित्य, आरोग्य, शैक्षणिक, कला, क्रीडा, उद्योग आणि पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व कर्तृत्ववान कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कवयित्री हेमलता गिते उपस्थित राहणार असून, साहित्यिक सीए डॉ. शंकर अंदानी हे संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार असल्याची माहिती संयोजन समितीचे प्रमुख पै. नाना डोंगरे यांनी दिली.


दि. 6 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या साहित्य संमेलनाची सुरुवात गावातून निघणाऱ्या भव्य ग्रंथ दिंडीने होणार आहे. या ग्रंथ दिंडीत साहित्यिक, कवी, लेखक तसेच साहित्यप्रेमी सहभागी होणार आहेत. ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये वाचन, साहित्य आणि पुस्तकांविषयीची आवड निर्माण करण्याचा संदेश दिला जाणार आहे. ग्रंथ दिंडीनंतर परिवार मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर दिवसभर विविध साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


संमेलनामध्ये ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि मान्यवरांचे परिसंवाद तसेच व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. बदलत्या सामाजिक परिस्थितीत साहित्याची भूमिका, ग्रामीण जीवनाचे साहित्यामधील प्रतिबिंब, वाचन संस्कृतीचे महत्त्व, नव्या पिढीसमोरील आव्हाने आणि साहित्याच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन अशा विविध विषयांवर मान्यवरांकडून विचारमंथन होणार आहे.


ग्रामीण भागातील साहित्यिक व कवींना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने संमेलनाच्या मध्य सत्रात विशेष कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध भागांतील कवी आपल्या कविता सादर करणार असून, ग्रामीण जीवन, सामाजिक वास्तव, निसर्ग, संस्कृती, शेतकरी जीवन आणि समकालीन विषयांना कवितेच्या माध्यमातून अभिव्यक्ती मिळणार आहे. वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने संमेलनस्थळी ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्रीचेही आयोजन करण्यात आले आहे. विविध विषयांवरील पुस्तके, साहित्यिक ग्रंथ, काव्यसंग्रह, वैचारिक साहित्य आणि वाचकांच्या आवडीची पुस्तके प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


या साहित्य संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. सामाजिक कार्य, साहित्यनिर्मिती, आरोग्यसेवा, शिक्षण, कला, क्रीडा, उद्योग आणि पर्यावरण संवर्धन आदी क्षेत्रांमध्ये योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींची दखल या माध्यमातून घेतली जाणार आहे.
ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या अनेक व्यक्ती प्रसिद्धीपासून दूर राहून समाजासाठी योगदान देत असतात. त्यांच्या कार्याचा सन्मान करून इतरांनाही सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळावी, हा पुरस्कार सोहळ्यामागील उद्देश आहे. पंचक्रोशीतील साहित्यिक, कवी, विद्यार्थी, शिक्षक, वाचक आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *