ईद उत्साहात साजरी; सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांच्याकडून मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देत शुभेच्छा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ईद-ए-मिलाद (मोहंमद पैगंबर जयंती) निमित्त वाळकी (ता. नगर) येथे मुस्लिम बांधवांनी उत्साहात ईद साजरी केली. या पवित्र सणाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी गावातील मुस्लिम समाजातील नागरिकांना गुलाबपुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. प्रेम, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून वाळकी गावात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडले.
ईद-ए-मिलाद हा मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र दिवस मानला जातो. मोहंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांकडून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. वाळकी येथेही यानिमित्ताने उत्साहाचे वातावरण होते. गावातील मुख्य चौकात ईदच्या पार्श्वभूमीवर सजावट करुन प्रसाद वाटप देखील करण्यात आले. गावातील मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच लहान मुलांची भेट घेऊन विजय भालसिंग यांनी त्यांना गुलाबपुष्प देत मनापासून ‘ईद मुबारक’ केले.
या वेळी धार्मिक सणाच्या शुभेच्छांसोबतच सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला. विविध धर्म, जाती आणि पंथातील नागरिकांनी परस्परांच्या सण-उत्सवात सहभागी होऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्यास समाजातील बंधुभाव अधिक दृढ होतो, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी बब्बू पठाण, फारूख शेख, अलीम शेख, आझाद बेग, हानीफ शेख, फिरोज आत्तार, समी शेख, आयान पठाण, आतीक पठाण यांच्यासह भाजपचे गणेश भालसिंग आदी उपस्थित होते.
विजय भालसिंग म्हणाले की, “ईद-ए-मिलाद हा प्रेम, शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. आपल्या गावात सर्व समाजातील नागरिक अनेक वर्षांपासून एकोप्याने राहत आहेत. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि सण-उत्सवाच्या माध्यमातून आपले संबंध अधिक दृढ करणे, हीच आपल्या गावाची खरी परंपरा आहे.”
ते पुढे म्हणाले, “हिंदू असो किंवा मुस्लिम, प्रत्येक धर्म माणुसकी, प्रेम आणि शांततेचा संदेश देतो. सण वेगवेगळे असले तरी आपला माणुसकीचा धर्म एकच आहे. त्यामुळे ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना आनंद होत आहे. आपल्या गावातील हिंदू-मुस्लीम ऐक्याची ही परंपरा अशीच पुढे सुरू राहावी, हीच सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. “तरुण पिढीने जात-धर्माच्या भिंतींपेक्षा मैत्री, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेला महत्त्व द्यावे. समाजात प्रेम आणि विश्वास वाढविण्यासाठी अशा छोट्या-छोट्या उपक्रमांची मोठी गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

