• Tue. Aug 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

रुग्णसेवेसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल विश्‍वास व श्रद्धेचे केंद्र -सीए अशोक पितळे

ByMirror

Aug 25, 2026
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थिरोग तपासणी शिबिर; 135 रुग्णांची तपासणी

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थिरोग तपासणी शिबिर; 135 रुग्णांची तपासणी


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रुग्णसेवेसाठी विश्‍वास व श्रद्धेचे केंद्र म्हणून आनंदऋषीजी हॉस्पिटलने नावलौकिक मिळवला आहे. प.पू. आनंदऋषीजी महाराजांच्या मानवसेवेच्या कार्याची पायाभरणी प.पू. आदर्शऋषीजी यांनी या हॉस्पिटलच्या उभारणीतून केली. जैन सोशल फेडरेशनचे सर्व सदस्य समर्पित भावनेने या कार्यात योगदान देत आहेत. रुग्णसेवेचे रोपटे आता वटवृक्षात बहरले असून, अनेक गरजू कुटुंबांना या सेवेच्या सावलीचा आधार मिळाला आहे, अशी भावना सीए अशोक पितळे यांनी व्यक्त केली.


जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषिजी महाराज यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त सीए अशोक धनराज पितळे परिवाराच्या वतीने मोफत अस्थिरोग तपासणी, मणके व सांधेबदली शस्त्रक्रिया तसेच फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सीए अशोक पितळे बोलत होते. यावेळी सौ. निता पितळे, मनीष पितळे, सीए गौरव पितळे, आनंद पितळे, संतोष बोथरा, डॉ. वसंत कटारिया, सतीश लोढा, माणकचंद कटारिया, वसंत चोपडा, तज्ज्ञ डॉ. विशाल शिंदे, डॉ. रोहन धोत्रे, स्पाइन सर्जन डॉ. अमित सुराणा, डॉ. श्रीकांत दलाल, डॉ. भरत जगताप, डॉ. नितीन कुमार, डॉ. अभय साठे, डॉ. आराधना अखडे आदी उपस्थित होते.


पुढे सीए पितळे म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सेवाकार्यात उद्योग-व्यवसाय सांभाळून अनेक कुटुंबे समर्पित भावनेने रुग्णसेवेशी जोडली गेली आहेत. त्यांची पुढील पिढीदेखील या कार्यात योगदान देत आहे. गरिबांना कमी खर्चात उपचार मिळावेत, हा रुग्णसेवेचा मापदंड घेऊन हॉस्पिटलमध्ये कार्य केले जात आहे. हॉस्पिटलच्या नेत्रालयाने राज्यात सर्वाधिक यशस्वी शस्त्रक्रिया करण्याचा मान मिळवला आहे. उपनगरातील नागरिकांसाठी तारकपूर येथेही सेंटर सुरू करण्यात आले असून, त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, शेवटच्या घटकेपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी ही सेवा सुरू झाली आहे. प्रत्येक सदस्य सद्भावनेने या कार्यात सहभाग देत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत. रुग्णसेवेचे प.पू. आदर्शऋषीजींचे स्वप्न या हॉस्पिटलच्या माध्यमातून साकारले गेले आहे. मानवसेवेचा विडा उचलून रुग्णसेवा मनोभावे केली जात आहे. यावर्षी नवीन प्रकल्प म्हणून अद्ययावत रोबोटिक सर्जरी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. कमी खर्चात अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. एमआरआय व इतर तपासण्याही रुग्णांना अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशोक पितळे हे नामवंत सीए असून, त्यांचा परिवार हॉस्पिटलच्या सेवाकार्याशी जोडला गेलेला आहे. मुंबई येथे झालेल्या कॉन्फरन्समध्ये आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या नेत्र विभागाची प्रामुख्याने दखल घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी हॉस्पिटलच्या विविध सुरू असलेल्या प्रकल्पांचीही माहिती त्यांनी दिली.


डॉ. विशाल शिंदे यांनी गुडघा प्रत्यारोपण व खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची माहिती दिली. गुणवत्तापूर्ण इम्प्लांटसह अल्पदरात शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. गोठलेला खांदा, मानदुखी व पाठदुखी याबाबतही उपचारांची माहिती त्यांनी दिली.


डॉ. नितीन कुमार यांनी सर्जरीनंतर शरीराची ताकद कमी होते. मात्र फिजिओथेरपीच्या माध्यमातून पूर्वीप्रमाणे शरीराच्या हालचाली करण्यासाठी सूक्ष्म व्यायाम पद्धती हॉस्पिटलमध्ये दिली जाते, असे सांगितले. योग्य व्यायामामुळे त्या हालचालींसाठी मेंदू सकारात्मक प्रतिसाद देतो. रुग्णांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे कामही केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मोफत शिबिरात एकूण 135 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी अस्थिरोग, मणके व सांधेदुखीबाबत रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्‍यक मार्गदर्शन केले. शिबिरामुळे गरजू रुग्णांना तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला तसेच पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन देण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *