सीएसआरडी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पाण्याचे एटीएम; सर्वसामान्य, कामगार व विद्यार्थ्यांना दिलासा
घरेलू मोलकरीण महिलांसाठीही मेळावा; शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा सेवाप्रीतचा संकल्प
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सर्वसामान्य नागरिक, कामगार, विद्यार्थी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणाऱ्या दरात शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या सामाजिक बांधिलकीतून सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने नगर-पुणे महामार्गावरील ग्रामीण विकास व अध्ययन केंद्र समाजकार्य व संशोधन संस्था (सीएसआरडी) महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुद्ध पिण्याच्या पाण्याचे एटीएम मशीन उभारण्यात आले आहे. अवघ्या 2 रुपयांत एक लिटर आर.ओ. शुद्ध पाणी उपलब्ध होणार असल्याने हा उपक्रम नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
शुद्ध पाणी ही केवळ गरज नसून प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. मात्र, वाढते शहरीकरण, पाण्याचे प्रदूषण आणि बाटलीबंद पाण्याच्या वाढत्या किमती यामुळे सर्वसामान्यांसमोर सुरक्षित पिण्याचे पाणी मिळविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. विशेषतः रोजंदारीवर काम करणारे कामगार, विद्यार्थी, रस्त्यावर व्यवसाय करणारे छोटे व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक यांना या समस्येचा अधिक सामना करावा लागतो. हीच गरज ओळखून सेवाप्रीतने अत्यल्प दरात शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.
या शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या एटीएम मशीन प्रकल्पाचे अनावरण सीएसआरडी महाविद्यालयाचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, प्रकल्प प्रमुख अर्चना खंडेलवाल, डॉ. सिमरन वधवा, लता राजोरिया, सारिका मुथा, अर्चना कुलकर्णी, रेखा बांब, कीर्ती पारीख, सविता धोखरिया, सीमा राजोरिया, संतोष झालानी, अंजू गुजराती, मंजू झालानी, देवकी कुलवाल, राजश्री रहाणे, अर्चना राजोरिया, नीता बंब, विद्या धोखरिया, न्यायाधार संस्थेच्या ॲड. निर्मला चौधरी, वैशाली सुरेश पठारे तसेच सीएसआरडी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पाणी एटीएमच्या माध्यमातून नागरिकांना अवघ्या 2 रुपयांत एक लिटर आर.ओ. शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. सेवाप्रीत सोशल फाउंडेशनने या प्रकल्पासाठी सुमारे एक लाख रुपयांचा खर्च केला आहे. प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सीएसआरडी महाविद्यालयाकडून पाहिली जाणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारे ड्रेन पाण्याची व्यवस्था देखील झाडांसाठी करण्यात आली आहे. यातून वृक्ष संवर्धनाचा संकल्प देखील साध्य होणार आहे.
नाममात्र दरातून मिळणारा निधी हा प्रकल्पाच्या देखभाल खर्चासाठी वापरला जाणार असून, नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यामागे नफा कमावण्याचा कोणताही उद्देश नसल्याचे सेवाप्रीतने स्पष्ट केले. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी हे पाणी जवळपास मोफत उपलब्ध करून दिल्यासारखेच आहे. या प्रकल्पासाठी 500 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसविण्यात आली असून, एका तासात सुमारे 100 लिटर पाणी उपलब्ध करून देण्याची क्षमता या यंत्रणेची आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थी, कामगार आणि परिसरातील नागरिकांनाही याचा लाभ घेता येणार आहे.
डॉ. सुरेश पठारे म्हणाले की, शुद्ध पाणी हा प्रत्येकाच्या जीवनाशी जोडलेला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. महाविद्यालयाच्या परिसरात येणारे विद्यार्थी, कर्मचारी, कामगार आणि नागरिक यांना कमी दरात सुरक्षित पाणी उपलब्ध व्हावे, ही अत्यंत चांगली संकल्पना आहे. सेवाप्रीत सोशल फाउंडेशनने सामाजिक बांधिलकीतून उभारलेला हा प्रकल्प निश्चितच अनुकरणीय आहे. समाजातील गरजू व्यक्तीला केवळ मदत करण्यापेक्षा त्याला स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे, हीच खरी सामाजिक सेवा असून, या ध्येयाने सेवाप्रीत कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, सेवाप्रीतच्या महिला सदस्या सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहे. शुध्द पाण्याची गरज ओळखून हा प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आला आहे. दोन रुपयांत एक लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करून देताना सेवाप्रीतला आर्थिक नफा अपेक्षित नाही. नागरिकांचे आरोग्य आणि त्यांना मिळणारा दिलासा हीच आमच्यासाठी खरी कमाई असल्याचे त्या म्हणाल्या.
अर्चना खंडेलवाल यांनी शुद्ध पाणी हा विषय नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. अनेक कामगार आणि विद्यार्थी बाहेरून पाणी विकत घेतात. त्यांच्यासाठी परवडणाऱ्या दरात शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून पाण्याचे एटीएम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा. दिवसभर कष्ट करून घरी परतणाऱ्या कामगाराला तहान लागल्यानंतर शुद्ध पाण्याची बाटली घेण्यासाठीही अनेकदा आर्थिक गणित करावे लागते. विद्यार्थ्यांनाही रोजच्या प्रवासात पाण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागतो. ‘पैशाअभावी कुणाची तहान राहू नये आणि दूषित पाण्यामुळे कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये,’ ही भावना या उपक्रमामागे असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी मुंबई येथील सीमा गुलाटी यांनी विशेष सहकार्य केले आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सीएसआरडी महाविद्यालयाच्या सभागृहात घरेलू मोलकरीण महिला कामगारांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. घरोघरी जाऊन कष्ट करणाऱ्या या महिला आपल्या कुटुंबाचा आर्थिक आधार असतात. मात्र, अनेकदा त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नसते. त्यामुळे योजनांचा लाभ मिळूनही त्या त्यापासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेऊन मेळाव्यात अश्विनी झरेकर यांनी घरेलू मोलकरीण महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. महिलांना केवळ योजनांची माहिती देऊन थांबायचे नाही, तर त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि शासकीय कार्यालयांमधील पाठपुरावा करण्यासाठी सेवाप्रीतच्या सदस्यांनी मदत करण्याचा संकल्प केला.

