• Sun. Aug 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

आजार होण्यापूर्वी काळजी घेण्यासाठी आरोग्य शिबिरांची भूमिका महत्त्वाची -दिपाली ललवाणी

ByMirror

Aug 23, 2026
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये बालरोग तपासणी शिबिराला प्रतिसाद; 65 बालकांची मोफत तपासणी;

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये बालरोग तपासणी शिबिराला प्रतिसाद; 65 बालकांची मोफत तपासणी;


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निरोगी व सदृढ समाजाचे स्वप्न घेऊन आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत रुग्णसेवा पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. सेवाभावातून विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करून समाजातील गरजू घटकांना आरोग्यसेवेचा आधार देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जात आहे. या सेवा कार्यात सहभागी होण्याची संधी व भाग्य मिळाले असून, आजार होण्यापूर्वी घेतलेली काळजी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे भविष्यातील गंभीर आजारांचा धोका टाळता येऊ शकतो. गरजू नागरिकांनी आरोग्य शिबिरांचा लाभ घेऊन भविष्यातील गंभीर आजार टाळण्यासाठी आवश्‍यक काळजी घ्यावी, असे आवाहन दिपाली ललवाणी यांनी केले.


जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषिजी म.सा. यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त प्रवरासंगम येथील अशोक सुवालाल ललवाणी परिवाराच्या वतीने मोफत बालरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी दिपाली ललवाणी बोलत होत्या. यावेळी सुमित ललवाणी, मार्इरा ललवाणी, डॉ. वसंत कटारिया, सतीश लोढा, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. आशिष भंडारी, माणकचंद कटारिया, अभय गुगळे, वसंत चोपडा, बालरोगतज्ज्ञ डॉ. निखीलकुमार गुट्टे, डॉ. वैभवी वंजारे, डॉ. दिपी अग्रवाल आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात डॉ. वसंत कटारिया म्हणाले की, प्रवरासंगम येथील ललवाणी परिवार धार्मिक व सामाजिक कार्याशी जोडला गेला असून, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या विविध सेवा कार्यातही त्यांचे योगदान राहिले आहे. समाज निरोगी राहावा आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हॉस्पिटलच्या माध्यमातून मिशन म्हणून सेवा कार्य सुरू आहे. नवजात बालक हे देशाचे भविष्य असून, त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्‍यक आहे. नवजात बालकांसाठी आवश्‍यक असलेल्या दर्जेदार आरोग्य सेवा आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहितीही डॉ. कटारिया यांनी दिली.


बालरोगतज्ज्ञ डॉ. निखीलकुमार गुट्टे यांनी सांगितले की, लहान बालकांच्या आरोग्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत एनआयसीयू सेंटर कार्यान्वित असून, तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांची टीम रुग्णसेवेसाठी कार्यरत आहे. 26 बेडच्या अद्ययावत एनआयसीयू विभागामध्ये नवजात बालकांच्या श्‍वासोच्छवासाच्या त्रासावर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच बालदमा, ए.आर.डी.एस. (श्‍वसनदाह), नवजात बालकांच्या कावीळीसाठी फोटोथेरपी व रक्त बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय अनुवंशिक आजार व जन्मजात आजारांचे निदान आणि उपचार, बालदमा तसेच लहान मुलांचे टू डी इको, एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब आणि डायलिसिस मशीनद्वारे सेवा उपलब्ध आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया सुविधाही उपलब्ध असल्याचे डॉ. गुट्टे यांनी सांगितले. सध्या पावसाळ्यात व्हायरल आजारांचे प्रमाण वाढले असून, लहान बालकांच्या उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


डॉ. दिपी अग्रवाल म्हणाल्या की, लहान बालकांचे लसीकरण हे भविष्यातील गंभीर आजार टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे पालकांनी जागरूक राहून बालकांचे वेळोवेळी व नियमित लसीकरण करून घेणे आवश्‍यक आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे लसीकरण उपलब्ध असून, ते अल्पदरात करून दिले जात आहे. बालकांच्या जीवनाची सुरुवात लसीकरणाने होते. भविष्यातील विविध आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच त्यांच्याविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असल्याने पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. अग्रवाल यांनी केले.


या मोफत बालरोग तपासणी शिबिराला नागरिक व पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये एकूण 65 बालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ बालरोग डॉक्टरांकडून बालकांची तपासणी करून आवश्‍यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले, तर आभार सतीश (बाबुशेठ) लोढा यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *