• Tue. Aug 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

भुईकोट किल्ल्यावर वृक्षारोपणाने स्वातंत्र्यदिन साजरा

ByMirror

Aug 18, 2026
सामाजिक कार्यकर्त्यांचा अनोखा उपक्रम

सामाजिक कार्यकर्त्यांचा अनोखा उपक्रम


पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित आणि हिरवाईने नटलेला देश निर्माण करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य -विजय भालसिंग


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीचा उत्साह विविध उपक्रमांतून व्यक्त होत असताना, अहिल्यानगर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भुईकोट किल्ला परिसरात वृक्षारोपण करून स्वातंत्र्यदिन साजरा केला. सामाजिक कार्यकर्ते तथा ‘वृक्ष मित्र’ विजय भालसिंग यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.


ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या परिसरात वडाच्या झाडाची लागवड करण्यात आली. वडाचे झाड हे भारतीय संस्कृतीत दीर्घायुष्य, स्थैर्य आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वडाची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विजय भालसिंग आणि शासनाचा पुरस्कार प्राप्त डॉ. सुनील सकट यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मानवी हक्क अभियानचे अशोक भोसले, माजी प्रा. डॉ. विजयकुमार पोटे, किरण शेरकर, माजी सैनिक शिवाजी गायकवाड, तनमय नागपुरे, राजेंद्र नागपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.


सामाजिक कार्यकर्ते तथा वृक्ष मित्र विजय भालसिंग म्हणाले की, “आपल्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करताना आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित आणि हिरवाईने नटलेला देश निर्माण करण्याचा संकल्प करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. केवळ वृक्षारोपण करून आपली जबाबदारी संपत नाही, तर लावलेले प्रत्येक झाड जगविणे ही खरी जबाबदारी आहे. झाडे आपल्याला प्राणवायू, सावली, फळे आणि पर्यावरणाचा समतोल देतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या आयुष्यात किमान काही झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करावा.”


“भुईकोट किल्ला हा आपल्या इतिहासाचा महत्त्वाचा ठेवा आहे. या ऐतिहासिक परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आलेला आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी बलिदान दिले; आज आपण पर्यावरणाचे रक्षण करून त्यांच्या त्यागाला खऱ्या अर्थाने मानवंदना देऊ शकतो,” असेही भालसिंग यांनी सांगितले. या उपक्रमातून ‘देशभक्तीबरोबरच पर्यावरणाची भक्ती’ आणि ‘वृक्ष जगवा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश देण्यात आला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *