• Tue. Aug 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

‘मुद्दल-व्याज फेडले, तरी जमिनीवर हक्क सांगितला जातोय’; सावकाराच्या वारसांविरोधात केंद्रीय मंत्री आठवले यांच्याकडे तक्रार

ByMirror

Aug 17, 2026
मिरीतील मागासवर्गीय कुटुंबाच्या 7.92 हेक्टर जमिनीचा वाद; दबाव, दमदाटी, धमकी व जातिवाचक अपमानाचे आरोप

मिरीतील मागासवर्गीय कुटुंबाच्या 7.92 हेक्टर जमिनीचा वाद; दबाव, दमदाटी, धमकी व जातिवाचक अपमानाचे आरोप


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्ज आणि त्यावरील मुद्दल-व्याजाची रक्कम अदा केल्यानंतरही संबंधित जमीन सावकाराच्या वारसांकडून हक्क सांगत बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील पीडित कुटुंबीयांनी केला आहे. जमीन ताब्यात देण्यासाठी दबाव, दमदाटी व दहशत निर्माण केली जात असून, फोन तसेच मध्यस्थांमार्फत धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री तथा सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री ना. रामदास आठवले यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जमीन मूळ मालकाच्या कायदेशीर वारसांच्या नावे करण्याची मागणी करण्यात आली आहे.


अहिल्यानगर दौऱ्यावर आलेले ना. रामदास आठवले यांची भेट घेऊन दिलीप राधाजी औताडे, बार्णबस बाबू औताडे, आनंदी उत्तम भाहवे, मंदा वसंत पाटोळे, बबीतादास गायकवाड व बी. डी. गायकवाड यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या उपस्थितीत निवेदन दिले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, मिरी येथील सर्वे नंबर 95, गट नंबर 96 मधील 7.92 हेक्टर जमीन त्यांचे आजोबा शंकर खंडू औताडे यांच्या मालकीची होती. मुलाच्या लग्नासाठी आर्थिक गरज निर्माण झाल्याने सन 1967 मध्ये त्यांनी खाजगी सावकाराकडून 400 रुपये घेतले होते. त्यासाठी 20 जुलै 1967 रोजी गहाणखरेदीखत करण्यात आले होते.


कर्जाची मुद्दल आणि त्यावरील व्याजाची रक्कम वेळोवेळी सावकाराला अदा करण्यात आली. मात्र, कुटुंब अशिक्षित असल्याचा फायदा घेत व्यवहार पूर्ण झाल्यानंतरही संबंधित खरेदीखत उलटून घेण्यात आले नाही, असा आरोप तक्रारदारांनी निवेदनात केला आहे. त्यामुळे कर्जाची रक्कम फेडूनही जमिनीवरील हक्काचा प्रश्‍न कायम राहिला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सावकाराचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी अनेक वर्षे या जमिनीचा ताबा घेतला नसल्याचेही तक्रारदारांचे म्हणणे आहे. मात्र, आता संबंधित सावकाराच्या वारसांकडून जमिनीवर हक्क सांगण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारदारांनी केलेल्या आरोपानुसार, काही नातेवाईकांकडून प्रत्येकी 50 हजार रुपये घेऊन 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बंधनामा करून घेण्यात आला आहे. उर्वरित नातेवाईकांवरही फोनद्वारे तसेच मध्यस्थांच्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.


‘जमीन देणार नाही’, ‘गावात येऊ देणार नाही’ अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोपही तक्रारदारांनी केला आहे. तसेच जातिवाचक शिवीगाळ व अपमान करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. मागासवर्गीय कुटुंबाच्या जमिनीवर आर्थिक व सामाजिक दबावाच्या माध्यमातून हक्क मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
सावकाराला मुद्दल व व्याजाची संपूर्ण रक्कम अदा करण्यात आल्याचा दावा करत, मिरी येथील संबंधित जमीन मूळ मालक शंकर खंडू औताडे यांच्या कायदेशीर वारसांच्या नावे करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यासाठी जमिनीशी संबंधित जुने दस्तऐवज, महसूल नोंदी, व्यवहार, गहाणखरेदीखत तसेच प्रत्यक्ष ताब्याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या चौकशीतून जमिनीच्या मालकी हक्काबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट करावी, तसेच धमकी, दबाव, जातिवाचक शिवीगाळ व अपमानाचे आरोप गंभीर असल्याने संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदारांनी ना. आठवले यांच्याकडे केली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *