• Fri. Aug 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीला तातडीने अटक करा

ByMirror

Aug 13, 2026
लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीला तातडीने अटक करा

रिपाइं महिला आघाडीची मागणी; अन्यथा 15 ऑगस्ट पासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण दत्तात्रय गुंड उर्फ बबलू याला तातडीने अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. पीडित महिला व रिपाइं महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ज्योतीताई पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले.


निवेदनात नमूद केल्यानुसार, शेंडी-पोखर्डी परिसरातील एका महिलेवर प्रवीण दत्तात्रय गुंड याने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेला सुमारे एक ते दीड महिन्याचा कालावधी उलटूनही संबंधित आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.


आरोपी गावात बिनधास्तपणे फिरत असल्याने पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पीडित कुटुंबीयांनी पोलीस प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला; मात्र अपेक्षित कारवाई होत नसल्याची तक्रार रिपाइं महिला आघाडीने केली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला आरोपी मोकाट फिरत असल्यास त्यातून कायदा-सुव्यवस्थेबाबत चुकीचा संदेश जातो. पीडित महिलेला न्याय मिळणे आणि प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्‍यक आहे. आरोपीवर तातडीने कायदेशीर कारवाई करून पीडितेला संरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


निवेदनात पुढे असा आरोप करण्यात आला आहे की, आरोपीवर कारवाई करण्याबाबत पोलिसांकडून टाळाटाळ होत असून, त्यामागे कोणाचा दबाव आहे का, असा प्रश्‍न पीडित कुटुंबीयांसमोर निर्माण झाला आहे. मात्र या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. त्यामुळे प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
पीडित महिलेला न्याय मिळाला नाही आणि संबंधित आरोपीला तातडीने अटक करण्यात आली नाही, तर 15 ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा रिपाइं महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *