राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने “चेतना दिन” व “मागणी दिन” साजरा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या आवाहनानुसार आज 11 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत “चेतना दिन” व “मागणी दिन” एकजुटीने साजरा केला. विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.
या आंदोलनात संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे, अध्यक्ष सुभाष तळेकर, उपाध्यक्ष अशोक मासाळ, विजय काकडे, भाऊ शिंदे, सुनील आहेर, सहचिटणीस संदिपान कासार, पुरुषोत्तम आडेप, सागर गायकवाड, मुकुंद शिंदे, मंजुषा बागडे, सी.पी. नोडके, सोनाली वडणे, मनीषा ओहोळ, एस.एम. वैद्य, लता गायकवाड, भाऊसाहेब डमाळे, वासुदेव राक्षे, अमीन इनामदार, विश्वेश्वर खेडेकर, दीपक चन्ने, वृषाली करोसिया, सुरेश जेढे, अमर शिंदे, सौरव बोठे, रेणुका येंबारे, कदम मॅडम, बोडके मॅडम आदींसह सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
11 ऑगस्ट 1966 हा दिन राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या जीवनातील संघर्षाचा आरंभिक टप्पा होता, ज्याच्या स्मृतीस उजाळा देत आजचा हा दिवस कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या लढ्यासाठी महत्त्वाचा ठरला. या पार्श्वभूमीवर चेतना दिन व मागणी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनासमोर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्याय्य मागण्यांचा आग्रह धरण्यात आला.
1 मार्च 2024 पासून आजपर्यंत सेवानिवृत्त झालेल्या व सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसाठी विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांना योजना अंमलबजावणीचे अंतिम आदेश येईपर्यंत “तात्पुरते निवृत्ती वेतन” तात्काळ देण्यात यावी, चतुर्थश्रेणी व वाहन चालक पदांसह सर्व रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, सेवानिवृत्तीची मर्यादा 60 वर्षे करण्यात यावी, सर्व सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक, कंत्राटी व रोजंदारी कामगारांना व्यापक कॅशलेस विमा योजना लागू करावी आणि लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना अपेक्षित वेतन वृद्धीचा लाभ मिळण्यासाठी योग्य उपाययोजना करावी, अशा प्रमुख मागण्यांसाठी हा लढा पुकारण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग उत्साहाने सहभागी झाले होते.
रावसाहेब निमसे यांनी संघटनेच्या एकजुटीने अनेक मागण्यांना यश आल्याचे स्पष्ट केले. सुभाष तळेकर यांनी सरकारी कर्मचारी एकजुटीने त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करीत असून, या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.
अशोक मासाळ म्हणाले की, कुठलाही लढा हा केवळ मागण्यांसाठी नसून तो कर्मचाऱ्यांच्या स्वाभिमानाचा आणि हक्काचा प्रश्न असतो. 1966 च्या संघर्षाची ती ज्वाला आजही आमच्या रक्तात आणि विचारात तेवत आहे; म्हणूनच आज 11 ऑगस्टचा ‘चेतना दिन’ म्हणजे केवळ एक उपक्रम नाही, तर आमच्या शिस्तीची आणि एकजुटीची ताकद शासनाला दाखवण्याचा हुंकार असल्याचे त्यांनी सांगितले.

