दिल्लीगेटच्या वेशीवर लोकप्रतिनिधींचा ‘कोरा राजीनामा’; सत्ता-संपत्ती-प्रतिष्ठेपेक्षा लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीला प्राधान्य देण्याचे आवाहन
लोकप्रतिनिधींनी संविधानिक नैतिकता आणि कायद्याच्या राज्याशी बांधील राहावे — ॲड. कारभारी गवळी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जंतर-मंतर क्रांती दिनाचे औचित्य साधून अहिल्यानगरच्या ऐतिहासिक दिल्लीगेटसमोर पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने ‘मनुस्मृतीशी राष्ट्रीय घटस्फोट’ आंदोलन करण्यात आले. हजारो वर्षांपासून भारतीय समाजाच्या धारणालयावर प्रभाव टाकणाऱ्या जातिव्यवस्था, स्त्रीदास्य, अंधश्रद्धा, अज्ञान तसेच स्वातंत्र्यानंतर वाढलेल्या मतदास्याच्या मानसिकतेविरोधात यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पाण्याने भरलेला घडा जाहीररीत्या फोडून, जन्माधारित विषमता आणि मानसिक गुलामगिरीच्या कालबाह्य धारणांशी वैचारिक नाते तोडण्याचा संदेश दिला. सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेला प्राधान्य देऊन लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीचा विसर पडलेल्या लोकप्रतिनिधींच्या निषेधार्थ ऐतिहासिक दिल्लीगेटच्या वेशीवर प्रतीकात्मक ‘कोरा राजीनामा’ लावण्यात आला.
सार्वजनिक जीवनात लोकप्रतिनिधी, लोकसेवक अथवा मतदार म्हणून कार्य करणाऱ्या व्यक्तीने सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेला लोकभक्ती, ज्ञानभक्ती व कर्मभक्तीपेक्षा अधिक महत्त्व दिल्यास तिच्या सार्वजनिक जीवनातील नैतिक अधिष्ठानालाच तडा जातो. अशा प्रवृत्तीला लोकशाही प्रक्रियेतून ‘संविधानिक घरकोंडी’ करण्याचा संदेश या प्रतीकात्मक कोऱ्या राजीनाम्यातून देण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.
आंदोलनादरम्यान ‘हर घर तिरंगा’, ‘हर भारतीय — तिरंगा धारणालय’ अशा घोषणा देण्यात आल्या. भारतीय तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज म्हणून नव्हे, तर प्रत्येक भारतीयाच्या आचार-विचारात संविधानिक मूल्यांचे धारणालय निर्माण करणारे प्रेरणादायी प्रतीक ठरावे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
तिरंग्यातील केशरी रंग लोकभक्तीचा, पांढरा रंग ज्ञानभक्तीचा आणि हिरवा रंग कर्मभक्तीचा संदेश देतो, तर अशोकचक्र संविधानिक नैतिकता, न्याय आणि कायद्याच्या राज्याशी असलेली अखंड बांधीलकी अधोरेखित करते, अशी या आंदोलनामागील संकल्पना मांडण्यात आली. त्यामुळे हातात तिरंगा उंचावणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या मनातही लोकभक्ती, ज्ञानभक्ती, कर्मभक्ती, संविधानिक नैतिकता आणि कायद्याचे राज्य यांचे धारणालय रुजले पाहिजे, असे आवाहन करण्यात आले.
पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी म्हणाले की, संसदीय लोकशाहीमध्ये मागच्या दाराने सत्ता हस्तगत करण्याचे प्रयत्न, मोठ्या प्रमाणावर मतांची खरेदी तसेच धर्म आणि जातीच्या भावनांचा राजकीय स्वार्थासाठी गैरवापर होणे ही लोकशाहीसमोरील गंभीर आव्हाने आहेत. अशा प्रवृत्तींमुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत भ्रष्टाचार, कायदाभंग आणि सार्वजनिक उत्तरदायित्वाचा ऱ्हास होण्याचा धोका वाढतो, असा आरोप त्यांनी केला.
या परिस्थितीवर ‘धारणालय क्रांती’ आणि ‘RECONSCIO क्रांती’ हा लोकशिक्षणाचा प्रभावी मार्ग ठरू शकतो, असे सांगून ॲड. गवळी म्हणाले, “प्रत्येक भारतीयाने सार्वजनिक जीवनात निर्णय घेताना स्वतःच्या सारासार विवेकाशी, उन्नत धारणालयाशी आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांशी बांधील राहिले पाहिजे. संविधानिक नैतिकता, कायद्याचे राज्य, सामाजिक समता, अद्ययावत ज्ञान आणि लोककल्याण यांना सर्वोच्च स्थान मिळाले पाहिजे.”
यावेळी समाजातील विविध स्वरूपाच्या मानसिक आणि राजकीय परावलंबित्वावरही आंदोलकांनी भाष्य केले. शासकीय योजनांचा मतांसाठी राजकीय वापर, नागरिकांच्या विवेकबुद्धीवर प्रभाव टाकून सत्ता मिळविण्याचे प्रयत्न तसेच ‘मला काय त्याचे’ या सार्वजनिक उदासीनतेच्या प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला. लोकशाहीला दुर्बल करणाऱ्या अशा प्रवृत्तींनीही सार्वजनिक जीवनातून प्रतीकात्मक राजीनामा द्यावा, असा संदेश दिल्लीगेट आंदोलनातून देण्यात आला.
या आंदोलनात ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, ॲड. अमित थोरात, राहुल आढाव, बाळासाहेब पालवे, आनंद आढाव, अशोक भोसले, पोपट भोसले, वीर बहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, अभिमान शिंदे, बाबासाहेब भोसले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलकांनी जातिव्यवस्था, स्त्रीदास्य, अंधश्रद्धा, अज्ञान आणि मतदास्याच्या मानसिकतेविरोधात वैचारिक व लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. संविधानिक नैतिकता, कायद्याचे राज्य, विवेक, ज्ञान, सामाजिक समता आणि लोककल्याण यांना भारतीय सार्वजनिक जीवनाच्या केंद्रस्थानी आणणे हीच ‘तिरंगा धारणालय क्रांती’ची दिशा असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

