अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे शिष्टमंडळ घेणार अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकरांची भेट
ब्लास्टिंग, उत्खनन व खनिज साठ्याची तक्रार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मौजे कापूरवाडी (ता. नगर) येथील गट क्रमांक 269/3/1/4 मध्ये कथितरित्या सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन, दगड फोडण्यासाठी करण्यात येणारे ब्लास्टिंग तसेच खनिज साठ्याप्रकरणी तातडीने निष्पक्ष चौकशी करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अहिल्यानगर तहसील कार्यालयाने दि. 18 मार्च 2026 रोजी तब्बल 10 कोटी 12 लाख 9 हजार 856 रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली असल्याचा दावा करण्यात आला असून, अद्यापही ही दंडाची रक्कम वसूल करण्यात आलेली नसल्याचा आरोप समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी केला आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, शासन निधीचा वापर तसेच महसुलाच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी विधिमंडळाची अंदाज समिती सध्या अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान समितीने वारूळवाडी व कापूरवाडी परिसरातील गौण खनिज उत्खननाच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान संबंधित परिस्थितीबाबत समितीने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित स्वरूपाची ठोस कारवाई झालेली नसल्याचे स्पष्ट करुन, अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दगड फोडण्यासाठी ब्लास्टिंग करण्यात येत असून, उत्खनन केलेल्या खनिजाचा साठाही करण्यात येत असल्याचे समितीच्या निदर्शनास आणून देणार असून, यासाठी समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांची भेट घेणार असल्याचे रोडे यांनी म्हंटले आहे.
या प्रकारामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित उत्खननाची परवानगी, रॉयल्टी, उत्खननाचे प्रमाण, खनिज साठा तसेच ब्लास्टिंगसाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर प्रकरणाबाबत यापूर्वीही महसूल विभागासह संबंधित शासकीय कार्यालयांकडे वेळोवेळी लेखी तक्रारी करण्यात आल्याचे संघटनेने म्हंटले आहे. तक्रारीनंतर संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे.
दि. 30 जून 2026 रोजी उत्खननाचा पंचनामा करण्यात आल्याचे समजते. मात्र, पंचनामा झाल्यानंतरही संबंधित परिसरात उत्खननाचे काम सुरू असल्याचे निदर्शनास येत असल्याचा दावा समितीने केला आहे. दरम्यान, चार ते पाच दिवसांपूर्वी गट क्रमांक 269 परिसरात ब्लास्टिंग मशीनच्या माध्यमातून दगडांमध्ये होल मारण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे.
या सर्व बाबींची महसूल, खनिकर्म तसेच संबंधित सक्षम विभागामार्फत संयुक्तपणे तपासणी करण्यात यावी. उत्खननासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, ब्लास्टिंगसाठी नियमांचे पालन करण्यात आले आहे का, तसेच शासनाचा महसूल बुडाला आहे का, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अहिल्यानगर तहसील कार्यालयाने दि. 18 मार्च 2026 रोजी रु. 10,12,09,856/- इतक्या दंडाच्या रकमेची नोटीस बजावल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या रकमेची नोटीस बजावूनही आजपर्यंत दंडाची प्रभावी वसुली का झाली नाही, असा सवाल अरुण रोडे यांनी उपस्थित केला आहे. दंडाची रक्कम वसुलीची प्रक्रिया, संबंधितांना बजावण्यात आलेल्या नोटिसा, उत्खननाचे प्रमाण आणि शासनाच्या महसुलाचे झालेले संभाव्य नुकसान याबाबत महसूल विभागाने पारदर्शकपणे माहिती जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कापूरवाडी परिसरातील कथित अवैध उत्खनन प्रकरणात कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला पाठीशी न घालता निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. नियमबाह्य उत्खनन, ब्लास्टिंग किंवा खनिज साठा झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शासनाची थकीत दंडाची रक्कम तातडीने वसूल करावी, अशी मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने केली आहे.

