पोदार, आर्मी पब्लिक, श्री साई व कैसर स्कूलचा दमदार विजय
विविध वयोगटांतील खेळाडूंच्या उत्कृष्ट कौशल्याची झलक
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी (दि. 4 ऑगस्ट) विविध वयोगटांतील सामने अत्यंत चुरशीचे आणि रंगतदार वातावरणात पार पडले. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या सामन्यांमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल, आर्मी पब्लिक स्कूल, श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल आणि कैसर इंग्लिश मीडियम स्कूल यांनी दमदार कामगिरी करत विजय मिळवला. तर मुलींच्या 16 वर्षांखालील गटातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.
सकाळच्या सत्रात 14 वर्षांखालील मुलांच्या गटात पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि ओएसीस इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्यात सामना झाला. पोदार इंटरनॅशनल स्कूलकडून आयान अत्तार याने 11 व्या मिनिटाला गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर यशराज ठुबे याने 29 व्या मिनिटाला दुसरा गोल करत संघाची आघाडी भक्कम केली. उत्कृष्ट बचाव आणि प्रभावी आक्रमणाच्या जोरावर पोदार इंटरनॅशनल स्कूलने 2-0 अशा फरकाने विजय मिळवला.
यानंतर 16 वर्षांखालील मुलांच्या गटातही पोदार इंटरनॅशनल स्कूलने ओएसीस इंग्लिश मिडीयम स्कूलवर 2-0 असा विजय मिळवत दुहेरी यश संपादन केले. या सामन्यात आर्यन साबळे याने दुसऱ्या मिनिटाला पहिला गोल करत संघाला सुरुवातीपासूनच आघाडी मिळवून दिली. त्यानंतर त्याने 50 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवत विजयावर शिक्कामोर्तब केले.
मुलींच्या 16 वर्षांखालील गटात आर्मी पब्लिक स्कूल आणि आर्मी एमआयसी ॲण्ड एस यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना झाला. दोन्ही संघांनी आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळाचे प्रदर्शन केले. संपूर्ण सामन्यात अनेक संधी निर्माण झाल्या, मात्र दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे हा सामना 0-0 अशा गोलशून्य बरोबरीत संपला.
14 वर्षांखालील मुलांच्या गटात आर्मी पब्लिक स्कूल आणि आर्मी एमआयसी ॲण्ड एस यांच्यात झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलने एकतर्फी वर्चस्व राखले. आकाश चौहान याने दुसऱ्या हाफमध्ये 40 व 47 व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला. अजय सांगळे याने 43 व्या मिनिटाला एक गोल करत संघाच्या आघाडीत भर घातली. तर रुद्र कांबळे याने 45 व 60 व्या मिनिटाला दोन गोल झळकावत संघाचा विजय निश्चित केला. आर्मी पब्लिक स्कूलने 5-0 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवत प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करू दिला नाही.
दुपारच्या सत्रात 16 वर्षांखालील मुलांच्या गटात आर्मी पब्लिक स्कूल आणि आर्मी एमआयसी ॲण्ड एस यांच्यात पुन्हा एकदा रोमांचक सामना रंगला. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी अनेक आक्रमणे केली, मात्र गोल करण्यात अपयश आले. अखेर प्रतिक शेळके याने 31 व्या मिनिटाला निर्णायक गोल करत आर्मी पब्लिक स्कूलला आघाडी मिळवून दिली. हा गोल अखेरपर्यंत कायम राखत आर्मी पब्लिक स्कूलने 1-0 अशा फरकाने विजय मिळवला.
14 वर्षांखालील मुलांच्या गटात श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल आणि कर्नल परब स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलने आक्रमक खेळ करत 4-0 अशा फरकाने एकहाती विजय मिळवला. साईदीप भगत याने 4 व्या मिनिटाला पहिला गोल करून संघाचे खाते उघडले आणि 24 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. अर्श शेख याने 21 व्या मिनिटाला तर आर्या शिंदे याने 38 व्या मिनिटाला गोल करत विजय अधिक दिमाखदार केला. कर्नल परब स्कूलला मात्र एकही गोल करता आला नाही.
16 वर्षांखालील मुलांच्या गटात श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल आणि कैसर इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यातही अत्यंत चुरशीचा सामना झाला. कैसर इंग्लिश मीडियम स्कूलकडून समर्थ शिंदे याने 28 व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर श्री लगड याने 46 व्या मिनिटाला दुसरा गोल करत संघाचा विजय निश्चित केला. कैसर इंग्लिश मीडियम स्कूलने 2-0 अशा फरकाने श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलचा पराभव करत स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले.

