एमआयडीसी पोलिसांना कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचे निवेदन; स्थानिक कचरा वेचकांचा रोजगार व प्रतिमा धोक्यात
संशयितांची कागदपत्रे तपासा, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा; पोलीस गस्त वाढविण्याचीही मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी व नागापूर परिसरात बोगस कचरा वेचक असल्याचे भासवत परप्रांतीय तसेच बाहेरून येणाऱ्या संशयित व्यक्तींचा वाढता वावर चिंतेचा विषय बनला असून, अशा व्यक्तींची सखोल चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत, अहिल्यानगरच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिवाजी थोरात यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
यावेळी संघटनेचे जिल्हा समन्वयक विकास उडाणशिवे यांच्यासह शकुंतला वाघमारे, इंदुबाई कटे, शारदा फजगे, ताराबाई जगधने, मंगल चांदणे आदी एमआयडीसी व नागापूर परिसरातील स्थानिक कचरा वेचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे कचरा संकलनाचे काम करणाऱ्या स्थानिक कचरा वेचकांच्या सुरक्षेचा, सन्मानाचा आणि रोजगाराचा प्रश्न या निवेदनातून उपस्थित करण्यात आला.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा, सुरक्षित वातावरणात उपजीविका करण्याचा तसेच कायद्यापुढे समान संरक्षण मिळण्याचा अधिकार दिला आहे. महाराष्ट्र पोलीस दल नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारीला आळा घालण्याचे महत्त्वाचे कार्य करत असल्याने या प्रकरणात निष्पक्ष चौकशीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
एमआयडीसी व नागापूर परिसरातील स्थानिक कचरा वेचक गेल्या 30 ते 35 वर्षांपासून रस्ते, कचरा कुंड्या, नाले आणि सार्वजनिक ठिकाणांवरील सुका कचरा गोळा करून उदरनिर्वाह करत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यात त्यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या अनेक पिढ्या याच परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे आधार कार्ड, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्रासह सर्व आवश्यक शासकीय कागदपत्रे आहेत. इतक्या वर्षांच्या कामकाजात त्यांचा कोणत्याही गुन्हेगारी कृत्याशी संबंध आलेला नाही.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून काही परप्रांतीय तसेच श्रीरामपूरसह इतर भागांतून येणाऱ्या काही व्यक्ती कचरा वेचक असल्याचे भासवत हातात गोण्या घेऊन दिवसभर परिसरात फिरताना दिसत असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले आहे. स्थानिक नागरिकांकडूनही अशा व्यक्ती दिवसभर परिसराची पाहणी करून रात्री चोरी, लूटमार किंवा इतर बेकायदेशीर कृत्ये करीत असल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, काही संशयित व्यक्तींविरोधात मारहाण, चोरी व लूटमारीसारख्या घटनांबाबत तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र अशा घटना घडल्यानंतर संशयाची सुई अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या स्थानिक कचरा वेचकांकडे वळते. त्यामुळे त्यांची बदनामी होते, नागरिकांचा विश्वास कमी होतो आणि त्यांच्या रोजगारावर गंभीर परिणाम होत असल्याचे म्हंटले आहे.
केंद्र शासन व राज्य शासनाच्या ‘नमस्ते (NAMASTE)’ योजनेचाही उल्लेख करण्यात आला आहे. कचरा वेचकांना सामाजिक सुरक्षा, सुरक्षितता आणि सन्मानाने रोजगार मिळावा यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. तसेच पुण्यातील ‘स्वच्छ (SWaCH)’, मुंबईतील स्त्रीमुक्ती संघटना आणि कोल्हापूर येथील ‘अवनी’ या संस्थांनी स्थानिक कचरा वेचकांच्या सहभागातून घनकचरा व्यवस्थापनाची यशस्वी मॉडेल उभारली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे बोगस कचरा वेचकांच्या वावरामुळे प्रामाणिक कचरा वेचकांची प्रतिमा मलिन होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे संघटनेने नमूद केले.
एमआयडीसी व नागापूर परिसरात बोगस कचरा वेचक म्हणून फिरणाऱ्या संशयित व्यक्तींची सखोल चौकशी करण्यात यावी, त्यांच्या ओळखपत्रांची, आधार कार्ड, रेशनकार्ड व इतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी, चोरी, लूटमार, मारहाण किंवा इतर गुन्ह्यांमध्ये सहभागी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, एमआयडीसी व नागापूर परिसरात नियमित पोलीस गस्त वाढविण्यात यावी, स्थानिक व प्रामाणिक कचरा वेचकांची बदनामी होणार नाही आणि त्यांचा रोजगार सुरक्षित राहील, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात व गरज भासल्यास स्थानिक कचरा वेचकांची अधिकृत नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यासाठी संबंधित विभागाशी समन्वय साधण्याची मागणी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच अनेक वर्षांपासून शहर स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या स्थानिक कचरा वेचकांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

