प्रगतिशील लेखक संघाच्या सहाव्या राज्य अधिवेशनाचा समारोपl
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतात पसरलेला धर्माधिष्ठित फॅसिझमचा पराभव करायचा असेल तर संविधानाशिवाय पर्याय नाही, त्यासाठी लेखकांनी सामाजिक भान ठेवून जबाबदारीने लेखन करणे आवश्यक आहे. सर्व कम्युनिस्ट चळवळी बरोबरच लोकशाहीवादी लोकांना एकत्र आल्याशिवाय धर्मांध शक्तींचा पराभव करता येणार नाही. लेखकांनी प्रगतिशील असले पाहिजे असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी केले.
प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने अहिल्यानगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित सहाव्या राज्य अधिवेशनाच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून कांगो बोलत होते.
पुढे कांगो म्हणाले की, आताच्या काळात जे अशक्य वाटत होते ते तरुणाईने दिल्लीमध्ये शक्य करून दाखवले आहे. जेन जीच्या नव्या पिढीतील मुले-मुली धर्मांध शक्तींच्या विरोधात उभे आहेत. सोशल मीडियावर ते सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत आहेत. हीच नव्या क्रांतीची सुरुवात आहे. नव्या पिढीने सोशल मीडियाचा वापर करून मुख्य प्रवाहातील माध्यमांची मक्तेदारी संपवली आहे. प्रगतिशील लेखक संघाने आता या तरुणांना एकत्र घेऊन काम केले पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी राज्य कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक जी. के. ऐनापुरे तर महासचिवपदी प्रसिद्ध कादंबरीकार राकेश वानखेडे यांची फेरनिवड करण्यात आली. समारोप प्रसंगी ॲड. कॉ. बन्सी सातपुते, दिवाकर कृष्णा आचार्य कॉ. नीलिमा बंडेलु, साहित्यिक डी.जी वाघ, जी.के. ऐनापुरे यांनीही मनोगते व्यक्त केले. राकेश वानखेडे यांनी प्रास्ताविक केले. तर डॉ. बापू चंदनशिवे यांनी सूत्रसंचालन केले. स्वागताध्यक्ष ॲड. सुभाष लांडे यांनी आभार मानले. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी ॲड. विद्या शिंदे, डॉ. श्याम शिंदे, डॉ. श्रीकांत काळोखे, कवयित्री सरोज आल्हाट, ज्ञानदेव पांडुळे, तानाजी सावळे, रियाज शेख, विवेक कसबे यांनी परिश्रम घेतले.

