विजेतेपदाची पटकाविली ढाल; 8 वर्षीय आरुष कांबळेची उत्कृष्ट कामगिरी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बारामती येथे पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या राज्यस्तरीय स्केटिंग शर्यतीत अहिल्यानगर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावून 6 फुटांची भव्य व मानाची विजेतेपदाची ढाल पटकाविली. या स्पर्धेत अहिल्यानगरच्या खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमार्इ करत जिल्ह्याचे वर्चस्व सिद्ध केले. या यशामध्ये अहिल्यानगरचा अवघ्या 8 वर्षांचा गुणवंत खेळाडू आरुष प्रविण कांबळे याने 8 वर्षांखालील गटात चमकदार कामगिरी करत कास्य पदक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
आरुष कांबळे हा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे सहायक महसूल अधिकारी प्रविण अंबादास कांबळे आणि स्वाती प्रविण कांबळे यांचा मुलगा आहे. अत्यंत बालवयात आरुषने या खेळात दाखवलेले कौशल्य आणि मिळवलेले हे यश सर्वांसाठीच अभिमानास्पद ठरले आहे. आई स्वाती यांचे या यशा मागे मोलाचे योगदान असल्याचे आरुष सांगतो.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या शेकडो नामांकित खेळाडूंमध्ये आरुषने अत्यंत कौशल्याने आणि जिद्दीने कामगिरी करत हे यश मिळवले आहे. या यशामागे अहिल्यानगर स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष गोरख धात्रक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच मार्गदर्शक केदार सर, आदित्य पालवे आणि सर्व पालकांनी घेतलेली मेहनत या यशाची मुख्य शिल्पकार ठरली.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल आणि बालखेळाडू आरुष कांबळे याच्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष आशिष दहिफळे यांनी सर्व खेळाडू, मार्गदर्शक व पालकांचे अभिनंदन केले. तसेच राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे, अध्यक्ष सुभाष तळेकर व उपाध्यक्ष अशोक मासाळ यांनी समस्त महसूल परिवार आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने बालखेळाडू आरुष कांबळे याचे विशेष कौतुक करून त्याला भविष्यातील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

