मेणबत्त्या प्रज्वलीत करुन व पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना अभिवादन
भारत माता की जय…, शहीद जवान अमर रहे!… च्या घोषणांनी परिसर दणाणला
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कारगिल युद्धातील भारतीय जवानांच्या अद्वितीय शौर्य, पराक्रम आणि सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करत शहरातील हुतात्मा स्मारक येथे रविवारी (दि. 26 जुलै) कारगिल विजय दिवस अत्यंत देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देशभक्तीपर गीतांनी भारावलेल्या वातावरणात ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘शहीद जवान अमर रहे’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. लायन्स क्लब ऑफ अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत शहीद जवानांना श्रध्दांजली वाहिली.
कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून कारगिल युद्धात मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांचे स्मरण करत उपस्थितांनी काही क्षण मौन पाळून त्यांच्या त्यागाला मानवंदना दिली.
यावेळी लायन्स क्लब ऑफ अहिल्यानगरचे अध्यक्ष हरजितसिंह वधवा, सचिव हरिश हरवानी, खजिनदार विजय कुलकर्णी, डॉ. संजय असनानी, डॉ. मानसी असनानी, प्रशांत मुनोत, सीए किरण भंडारी, सुनिल छाजेड, भावना छाजेड, दिलीप कुलकर्णी, पै. नाना डोंगरे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे विवेक कसबे, गोविंद राजगुरू, प्रतिक ठोकळ, अविनाश साठे, अजित कुऱ्हाडे यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरजितसिंह वधवा म्हणाले की, “कारगिलच्या रणभूमीवर भारतीय जवानांनी दाखविलेला पराक्रम प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. देशाच्या सीमांचे रक्षण करताना आपल्या प्राणांची पर्वा न करता त्यांनी दिलेले बलिदान कधीही विसरता कामा नये. प्रत्येक नागरिकाने आणि विशेषतः युवकांनी मनात देशभक्तीची ज्योत तेवत ठेवून देशहितासाठी आपले योगदान देण्याचा संकल्प करावा.”
ते पुढे म्हणाले की, देश सुरक्षित असल्यामुळेच आपण शांततेत जीवन जगत आहोत. या सुरक्षिततेमागे आपल्या सैनिकांचे अथक परिश्रम, त्याग आणि समर्पण आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
हरिश हरवानी यांनी कारगिल युद्धाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व उपस्थितांसमोर उलगडून सांगितले. ते म्हणाले, “कारगिल विजय दिवस हा केवळ एक स्मृतिदिन नसून भारतीय सैन्याच्या अदम्य धैर्याचा आणि राष्ट्रनिष्ठेचा गौरव करणारा दिवस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विजय कुलकर्णी यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून दरवर्षी हा दिवस साजरा करून आम्ही शहीद जवानांना आदरांजली अर्पण करतो आणि समाजात देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आहे. आजच्या तरुण पिढीला कारगिल युद्धातील शौर्यगाथा माहिती असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी हातात मेणबत्त्या घेऊन वीर जवानांना अभिवादन केले. मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले आणि कारगिलमधील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. देशभक्तीपर घोषणांनी आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेने संपूर्ण वातावरण भारावून गेले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

