• Tue. Jul 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

आदम बशीर शेख ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मानित

ByMirror

Jul 27, 2026
आदम बशीर शेख ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मानित

अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने गौरव; उपक्रमशील शैक्षणिक कार्याची दखल


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, उपक्रमशील कार्य आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत ढवळपूरी (ता. पारनेर) येथील श्री दुर्गादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदम बशीर शेख यांना अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने ‘आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.


शहरातील अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षण निरीक्षक श्रीराम थोरात यांच्या हस्ते आदम शेख यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त आणि सामाजिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.
या पुरस्कार सोहळ्यास माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाचे राज्याध्यक्ष संजयकुमार निक्रड, अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ घुले, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, तसेच विष्णू मगर, राजेंद्र बारगुजे, अविनाश बोंद्रे, दीपक शिंदे, अतुल पटवा, कल्याण ठोंबरे, सोमनाथ सुंबे, अमोल देशमुख, नवनाथ साळवे, नितीन जगताप, इस्माईल शेख, अनिल वाकचौरे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आदम बशीर शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्यरत असून, ढवळपूरी येथील श्री दुर्गादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय वाढ घडवून आणली आहे. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करणे, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, डिजिटल शिक्षणाचा वापर, विविध शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन, विज्ञान, गणित आणि सामाजिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे, तसेच संस्कारक्षम आणि जबाबदार नागरिक घडविण्याच्या दृष्टीने त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.


त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली असून, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये विश्‍वासाचे नाते निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत गुणवत्ता, शिस्त आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा त्यांनी अवलंब केल्यामुळे उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून त्यांनी जिल्ह्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाने त्यांचा ‘आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ देऊन गौरव केला. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *