शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; स्वच्छता अभियानाने सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लोककल्याणकारी विचारांचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि वैष्णवी ऑप्टिकल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरातून अनेक गरजू नागरिकांना लाभ घेतला.
तसेच यावेळी संत सावता महाराज मंदिर परिसरात स्वच्छता अभियानही राबविण्यात आले. या उपक्रमाद्वारे सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देत सामाजिक जबाबदारीची जाणीव ग्रामस्थांमध्ये निर्माण करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य तथा स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी लक्ष्मण चौरे, डॉ. वैष्णवी संजय जरबंडी, डॉ. ओमकेश सत्यनारायण कोंडा, दत्तात्रय फलके, जालिंदर शिंदे, अरुण काळे, तुकाराम फलके, छगन भगत, भाऊसाहेब ठाणगे, सावळेराम येवले, बबन जाधव, बाबा खळदकर, भाऊसाहेब आनंदकर, विठ्ठल शिंदे, रामदास जाधव, श्री नवनाथ युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, अनिल आनंदकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पै. नाना डोंगरे म्हणाले की, वाढत्या महागाईमुळे आरोग्यसेवा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. विशेषतः ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांच्या विविध आजारांचा सामना करावा लागत असून, नेत्रशस्त्रक्रिया आणि उपचार महात्मा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा मोफत तपासणी शिबिरांमुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. वैष्णवी संजय जरबंडी यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील नागरिकांना सेवाभावाने गुणवत्तापूर्ण नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. तपासणीदरम्यान दृष्टीदोष आढळलेल्या अनेक रुग्णांवर अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यामध्ये मोतीबिंदू आणि काचबिंदूसारख्या गंभीर नेत्ररोगांवरील उपचारांचा समावेश करण्यात आला आहे.
गावातील संत सावता महाराज मंदिर परिसरात आयोजित या शिबिरामध्ये सुमारे 65 ग्रामस्थांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीत 5 रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाल्याने त्यांच्यावर अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच गरजू नागरिकांना अल्पदरात नंबरचे चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. आरोग्यसेवा आणि स्वच्छतेचा संदेश देणारा हा उपक्रम ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला असून, उपस्थितांनी आयोजकांचे आभार मानले.

