• Thu. Jul 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

स्व. अजित पवार जयंतीनिमित्त बुरुडगावात ‘लाडक्या बहिणीं’ना साड्यांची अनोखी भेट

ByMirror

Jul 23, 2026
स्व. अजित पवार जयंतीनिमित्त बुरुडगावात ‘लाडक्या बहिणीं’ना साड्यांची अनोखी भेट

एक हजारांहून अधिक महिलांना सहावारी-नऊवारी साड्यांचे वाटप; ‘अजित पवार अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते संकेत कुलट आणि नवनाथ वाघ यांचा उपक्रम

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बुरुडगाव येथे सामाजिक बांधिलकी जपत महिलांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते संकेत कुलट आणि नवनाथ वाघ यांच्या पुढाकारातून तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील ‘लाडक्या बहिणीं’ना नवीन सहावारी व नऊवारी साड्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात एक हजारांहून अधिक महिलांना साड्यांचे वितरण करण्यात आले असून, महिलांचा या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी त्यांच्या कार्याला उजाळा देत आदरांजली वाहिली. यावेळी “अजित पवार अमर रहे” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. महिलांनीही मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभाग नोंदवित उपक्रमाचे स्वागत केले.
यानंतर गावातील महिलांना नवीन सहावारी आणि नऊवारी साड्यांचे वितरण करण्यात आले. साडी स्वीकारताना अनेक महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. सामाजिक बांधिलकी जपत महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
याप्रसंगी सोनाली कुलट, स्नेहल कुलट, मनिषा कुलट, मंगल वाघ, सुभाष कुलट, मुन्ना कुलट, विशाल पवार, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, मुख्याध्यापक मंगेश झिने, भाजप अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अकिलभाई इनामदार, दिलीप बोठे, राधाकिसन कुलट, जालिंदर कुलट, खंडू काळे, बाळासाहेब जाधव, दिनेश शेळके, रवींद्र डमढेरे, अमित जाधव, दिलीप पाचारणे, गणेश दरंदले, भैय्या शिंदे, भैय्या साळुंके, संदीप पाचारणे, सोहेल सय्यद, जब्बार शेख, अविनाश कुलट, राजू शेख, गहिनीनाथ वाघ यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संकेत कुलट म्हणाले की, स्व. अजित पवार यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा दिली. त्यांचा आमदार संग्राम जगताप यांच्यावर विशेष विश्‍वास होता. त्या विश्‍वासाच्या बळावर आमदार जगताप यांनी अहिल्यानगर शहर आणि परिसरासाठी मोठ्या प्रमाणात विकासनिधी उपलब्ध करून अनेक महत्त्वाकांक्षी विकासकामे मार्गी लावली. स्व. अजित पवार यांच्या कार्यातून समाजासाठी काहीतरी देण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


नवनाथ वाघ म्हणाले की, स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून गावातील लाडक्या बहिणींना एक छोटीशी भेट देण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिलांचा सन्मान आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने साडी वाटपाचा हा उपक्रम आयोजित करण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आनंद पोहोचविण्याची प्रेरणा आम्हाला दादांच्या कार्यातून मिळाली. आज एक हजारांहून अधिक महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आमच्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे. यापुढेही गावात शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबवून समाजसेवेचा हा प्रवास अधिक व्यापक करण्याचा आमचा संकल्प असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *