• Wed. Jun 10th, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगरमधील नागरिकांचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीचे स्वागत

ByMirror

Jun 10, 2026
सुप्रभात मॉर्निंग ग्रुपचा पुढाकार

पूर्वीच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांचा चव्हाट्यावर निषेध


सुप्रभात मॉर्निंग ग्रुपचा पुढाकार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच अवघ्या तीन दिवसांत भेसळखोरांवर सर्जिकल स्ट्राईक करणारे धडाडीचे अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी आता नागरिक उभे राहत आहे. अहिल्यानगरमध्ये सुप्रभात मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य आणि जागरूक नागरिकांनी एकत्र येत जॉगिंग ट्रॅकवर अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात तुकाराम मुंढे यांचा ‘अभिनंदन फलक’ लावून त्यांनी अन्न भेसळ विरोधात सुरु केलेल्या कारवाईचे स्वागत करण्यात आले आहे. तर पूर्वीच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांचा चव्हाट्यावर ‘निषेध करणारा फलक’ लावून नागरिकांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला.


तुकाराम मुंढे यांनी पदभार घेताच अवघ्या तीन दिवसांत 53 धाडी टाकून 33 भेसळखोरांना गजाआड केले, तसेच कोट्यवधी रुपयांचा बनावट व भेसळयुक्त मुद्देमाल जप्त केला. “जर तीन दिवसांत एवढी मोठी कारवाई होऊ शकते, तर यापूर्वीचे अधिकारी वर्षानुवर्षे काय करत होते?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या संदर्भातील एक सविस्तर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना देण्यात आले.


जनतेच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या FDA विभागात तुकाराम मुंढे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानण्यात आले. पूर्वीच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांची चौकशी करा, मुंढे यांच्या आधी या पदावर असलेल्या ज्या अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली आणि ज्यांच्यामुळे भेसळखोरांचे रॅकेट फोफावले, अशा तत्कालीन अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.


मुंढे यांच्या बदलीची ‘फिल्डिंग’ रोखा: प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली करण्यासाठी भ्रष्ट लॉबी आणि हितसंबंधी सक्रिय होण्याची शक्यता असते. शासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता मुंढे याच पदावर पूर्ण संरक्षण द्यावे, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली आहे. “लहान मुलांच्या दुधापासून ते आजारपणातील औषधांपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये भेसळ करणाऱ्या नराधमांना पोसणाऱ्या व्यवस्थेचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला.


यामध्ये सुप्रभात मॉर्निंग ग्रुपचे सदस्य, महिला भगिनी आणि तरुणांचा प्रचंड सहभाग होता. लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्‍न असल्याने महिलांचा सहभाग अत्यंत लक्षणीय होता. “मुंढे साहेबांचे अभिनंदन झालेच पाहिजे आणि आधीच्या कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे,” अशी एकच भावना सर्वांच्या मुखातून व्यक्त होत होती.


या आंदोलनातून अहिल्यानगरमध्ये सध्या प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ आणि भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात एल्गार पुकारण्यात आला. यावेळी सुप्रभात ग्रुपचे सदस्य शिवाजीराव साळवे, ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सोनवणे, विजय कुलाळ, साहेबराव आनंदकर, शैलेश राजगुरू, सुभाष मिसाळ, सूर्यकांत दगडे, भास्कर मिसाळ, बाळकृष्ण आव्हाड, वसंत सिंग, सुनील राऊत, रमेश पळसे, सुनील कुलकर्णी, बाळासाहेब कुलकर्णी, राजेंद्र दासरी, विजय पाटोळे, जालिंदर तनपुरे स्वानंदी महिला ग्रुपच्या सर्व सदस्या सौ. सोनल जोशी, आशा विधाते, संध्या वारे, वर्षा गुरनानी आदी उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *