• Thu. Aug 27th, 2026

Mirrornews24

Marathi News

मुकुंदनगरच्या रहिवासी भागातील अनधिकृत मंगलकार्यालयामुळे नागरिक त्रस्त; परवाना रद्द करण्याची मागणी

ByMirror

Jun 6, 2026
‘कम्युनिटी हॉल’च्या नावाखाली नियमबाह्य बांधकाम केल्याचा दावा

सहारा सिटीतील रहिवाशांची जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांकडे तक्रार; वाहतूक कोंडी व दमदाटीचा आरोप


‘कम्युनिटी हॉल’च्या नावाखाली नियमबाह्य बांधकाम केल्याचा दावा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील मुकुंदनगर परिसरातील सहारा सिटी येथे रहिवासी भागात उभारण्यात आलेल्या कथित अनधिकृत मंगलकार्यालयामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत संबंधित मंगलकार्यालयाचा परवाना रद्द करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत सय्यद हाफिजद्दीन सय्यद राजा यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच सहायक संचालक तथा नगररचना विभाग प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.


तक्रारीत नमूद केल्यानुसार, सर्वे नं. 333/1/2/334/1/2 येथील सहारा सिटी हा परिसर महानगरपालिका हद्दीतील प्रामुख्याने रहिवासी भाग आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले वास्तव्यास आहेत. शासनाच्या नियमानुसार अशा ठिकाणी राखीव ॲमिनिटी क्षेत्राचा वापर बालकांसाठी खेळाचे मैदान, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य व मार्गदर्शन केंद्र, महिला सक्षमीकरण उपक्रम तसेच सामाजिक उपक्रमांसाठी करण्यात यावा, असा उद्देश असल्याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे.


मात्र, या ॲमिनिटी क्षेत्रात नूर मोहम्मद अबीद शेख यांनी व्यावसायिक हेतूने मंगलकार्यालय उभारल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या मंगलकार्यालयासाठी आवश्‍यक असलेल्या पार्किंग सुविधेचा अभाव असल्याने कार्यक्रमांना येणाऱ्या पाहुण्यांची वाहने मुख्य रस्त्यावर उभी केली जातात. परिणामी परिसरात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून रहिवाशांना दैनंदिन ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


तसेच रस्त्यावर उभी करण्यात आलेली वाहने हटविण्याची विनंती केल्यास संबंधितांकडून नागरिकांना शिवीगाळ, दमदाटी व त्रास दिला जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.


तक्रारदारांच्या मते, महानगरपालिकेकडून कम्युनिटी हॉलच्या नावाने परवानगी घेण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मंजूर नकाशाच्या विरोधात अतिक्रमण करून व्यावसायिक स्वरूपाचे मंगलकार्यालय उभारण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून नियमबाह्य बांधकामावर कारवाई करावी, संबंधित परवाना रद्द करावा आणि सहारा सिटी परिसरातील नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *